दालमिया शुगर्सचे ‘स्वभिमानी’ला 3300 रूपये पहिली उचल देण्याचे आश्वासन

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील दालमिया शुगर्स आसुर्ले -पोर्ले या साखर कारखान्याने चालू वर्षी तुटणा-या उसाला ३२०० रूपयाप्रमाणे एफ.आर.पी शेतक-यांच्या खात्यावर अदा करू लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष सागर शंभुशेटे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कारखान्याचे गाळप बंद पाडण्याचा इशारा देत ठिय्या आंदोलनाची भुमिका घेतली. दरम्यान, कारखाना प्रशासनाने दोन दिवसाची मुदत मागून बुधवार संध्याकाळपर्यंत एफ.आर.पी. अधिक १०० प्रमाणे पहिली उचल जाहीर करत असल्याचे लेखी पत्राव्दारे कळविल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

गेल्या दोन महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दराचे आंदोलन सुरू आहे. निवेदने, मोर्चा, मोटारसायकल रॅली, आक्रोश पदयात्रा, ढोल ताशा आंदोलन आदी वेगवेगळी आंदोलने केली. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला ३ हजार पेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी प्रतिटन १०० रूपये व ३ हजार रूपयापेक्षा जादा दर दिलेल्या साखर कारखान्यांनी ५० रूपये प्रतिटन दर देवून चालू वर्षी तुटणा-या ऊसाला एफ.आर.पी अधिक १०० रूपये दर देण्याचा तोडगा मान्य करण्यात आला. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील ब-याच कारखान्यांनी दर जाहीर करत साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू केला.

दालमिया कारखान्याच्या प्रशासनाने ३२०० रूपये प्रमाणे ऊस बील शेतक-यांच्या खात्यावर जमा करत ऊसदराची वेगळीच चूल मांडली. संतप्त झालेल्या ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी कारखाना कार्यस्थळावर आल्यानंतर घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. दालमिया कारखाना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ५० रूपये प्रतिटन व चालू वर्षी तुटणा-या ऊसास एफ. आर. पी अधिक शंभर रूपये प्रमाणे ३३८४ रूपये प्रतिटन दर देणे लागते, मात्र कारखान्याने शेतक-यांच्या खात्यावर ३२०० रूपयाप्रमाणे पैसे अदा केले आहे.

‘स्वाभिमानी’च्या शिष्टमंडळाने कारखाना प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. कारखान्याला पुरवठा होणा-या ऊसाचा पै आणि पैचा हिशोब सांगू लागल्याने कारखाना प्रशासनाने बुधवारपर्यंत निर्णय घेवू, असे लेखी कळविले आहे. बुधवारी तोडगा न निघाल्यास शुक्रवार पासून कारखाना गेटवर पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू करून कारखान्याचा गळीत हंगाम बंद पाडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष सागर शंभुशेटे, जनार्दन पाटील, विक्रम पाटील-भुयेकर, रामराव चेचर, भिमगोंडा पाटील, विक्रम पाटील-तिरपणकर, दगडू गुरवळ यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पन्हाळा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here