‘दत्त – दालमिया शुगर’ देणार एकरकमी ३,२०० रुपये पहिला हप्ता : युनिट हेड एस. रंगाप्रसाद

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील श्री दत्त दालमिया भारत शुगर कारखान्याने चालू वर्षी साडेदहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदा, २०२३-२४ सालासाठी गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रती टन ३,२०० रुपये एकरकमी पहिला हप्ता जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. दालमिया कंपनीने नेहमी उच्चांकी दर दिला आहे. यापुढेदेखील उच्चांकी ऊस दर देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.

युनिट हेड एस. रंगाप्रसाद म्हणाले की, सरकारच्या धोरणानुसार हंगाम संपल्यानंतर सरासरी साखर उताऱ्यावर आधारित एफआरपी राहणार आहे. त्यामुळे कारखान्याच्यावतीने गाळप हंगामासाठी पहिली उचल प्रती टन ३,२०० रुपये जाहीर केली आहे. हंगाम संपल्यानंतर जो साखर उतारा राहील, त्याआधारे उर्वरित ऊस दराची रक्कम दिली जाईल. रंगाप्रसाद यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन केले. यावेळी मुख्य शेती अधिकारी श्रीधर गोसावी, सहायक शेती अधिकारी संग्राम पाटील, असिस्टंट शेती अधिकारी शिवप्रसाद देसाई, एचआर प्रमुख सुहास गुडाळे, कर्मचारी प्रतिनिधी विलास शिंदे, एम. एम. पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here