मुंबई : डीसीएम श्रीरामने गुजरातमधील भरूच येथे रिन्यू पॉवर (ReNew Power) च्या माध्यमातून ५० मेगावॅट अक्षय्य ऊर्जा स्रोत सुरू करण्याची योजना तयार केली आहे. डीसीएम श्रीराम कंपनी केमिकल, साखर आणि खते यांच्या व्यवसायाशी संलग्न आहे. आणि रिन्यू पॉवरने दोन कॅप्टीव्ह पॉवर करारांवर (सीपीए) स्वाक्षरी करण्याची घोषणा केली आहे. नियामकांकडे केलेल्या फायलिंगनुसार, या करारानुसार रिन्यू पॉवर आगामी दोन योजनांतून ५० मेगावॅट अक्षय्य ऊर्जेचा पुरवठा करेल.
डीसीएम श्रीरामचे अध्यक्ष आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक अजय एस. श्रीराम यांनी सांगितले की, आम्ही अक्षय्य ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि त्या दिशेने जाण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही ईएसजीसाठी (पर्यावरण, सामाजिक आणि कॉर्पोरेट प्रशासन) दीर्घकालीन कटीबद्धतेसह हरित ऊर्जेसाठी कॅप्टीव्ह पॉवर करारावर २५ वर्षांसाठी स्वाक्षरी केली आहे आणि यातून कार्बन उत्सर्जन खूप कमी होणार आहे. डीसीएम श्रीराम लिमिटेडद्वारे जवळपास ६३ कोटी रुपयांच्या इक्विटी भागीदारीच्या माध्यमातून ८०० कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणूकीसह दोन हायब्रीड योजनांची स्थापना केली जाईल.