स्वाभिमानीच्या ऊस परिषदेचा निर्णय 3 नोव्हेंबरला

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांचा आणि स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा 3 नोव्हेंबरला कल्पवृक्ष गार्डनमध्ये घेतला जाणार आहे. यावेळी ऊस परिषदेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. सरकार स्थापनेच्या गोंधळात लोकप्रतिनिधींचे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीकडे लक्ष नाही. निसर्गाने मारले असताना किमान शासनाने तरी तारले पाहिजे होते. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाल्याशिवाय कंपन्या भऱपाई देणार नाहीत. जर 5 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे झाले नाहीत, त्यानंतर राज्यभर स्वाभीमानी स्टाईलने उग्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभीमाने शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शेट्टी म्हणाले, वर्षभर कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांची झोळी रिकामीच राहिली. शिवाय कर्जावरील व्याज मात्र वाढत आहे. कर्जमुक्तीचा गोंधळ, त्यात महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झला आहे. अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली आहेत. या पिकांचे पंचनामे होणे गरजेचे आहे. अन्यथा विमा कंपन्या भरपाई देणार नाहीत. पण सरकार स्थापनेच्या गोंधळात सरकारचे इकडे लक्ष नाही.
 शेतकर्‍यांना सरकारने मदत करणे अपेक्षित होते. त्यामुळे आता रस्त्यावर उतरुन सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची जाणीव करुन देईल. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात उग्र आंदोलन करु, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here