साखर कामगारांना हवे आहे ‘इच्छामरण‘

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका. जिथल्या आदिनाथ साखर कारखान्यातील साखर कामगारांना तब्बल 41 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. विधानसभा निवडणुकांमुळे या तालुक्यात चांगलच राजकारण चालत. पण याच तालुक्यातील आदिनाथ साखर कारखान्यातील कामगार मात्र अक्षरश: इच्छामरणाची मागणी करत आहेत. तसे निवेदनही त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिले आहे.

घाम गाळून रोजचे काम नियमितपणे करुनही आदिनाथ कारखान्यातील कामगारांना 41 महिन्यांपासून कामाचा मोबदला मिळालेला नाही, यामुळे त्यांची अर्थिक दुरावस्था झालेली आहे. यावर आता काही मार्ग निघेल असेही त्यांना वाटत नसल्याने निराश झालेल्या कामगारांनी शासनाकडे थेट ‘इच्छामरणाची‘ मागणी केली आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे, महादेव मच्छिंद्र मस्के, शांतीलाल जनार्दन घाडगे, देवीदास दिगंबर कुंभार, आबासाहेब बाबूराव बुधवंत, अंकुश झारगड, प्रवीण पोपट जाधव आदी 31 कामागरांनी आपले दु:ख मांडले आहे.

आदिनाथ साखर कारखाना, म्हणजे राजकारणाचा केंद्रबिंदू. इथला कारभार नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. शेळगाव-भाळवणी येथे उभारलेला आदिनाथ साखर कारखाना पाच हजार मे. टन ऊस गाळप क्षमतेचा आहे. परंतु, उजनी धरणाजवळ असताना आणि ऊसाचीही कमतरता नसताना कारखाना नीट चालत नाही. यामुळे सततच्या अर्थिक अडचणीत असणारा हा कारखाना आजवर सावरलेला नाही. या आर्थिक समस्यांची झळ आता कामगारांनाही बसू लागली आहे. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत दाखल झालेल्या रश्मी बागल-कोलते यांच्या ताब्यात असणार्‍या आदिनाथ कारखान्यातील कामगारांवर पगाराविना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.

आपल्या मुलांचे शिक्षण, आजारपण, लग्न, कार्य, सणवार, घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी या कामगारांना पै पाहुणे किंवा खाजगी सावकारांकडे हात पसरावे लागत आहेत. कामगारांचे पगाराविना अतिशय हाल होत आहेत. मुला मुलींना शिक्षण अर्धवट सोडून पैसा मिळवण्यासाठी भटकावे लागत आहे. अत्यंतिक आर्थिक ओढाताणीखाली असणारे कामगार वैफल्यग्रस्त झाले आहेत. तरीही कारखान्याशी संबंधीत असणार्‍या राजकीय नेत्यांवर, त्यांच्या राहणीमानावर याचा काहीही परिणाम होत नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here