उसाला नुकसान पोहचवणाऱ्या हुमणी किडीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून प्रात्यक्षिक

बीड : हुमणी किडीमुळे प्रामुख्याने उसासह भुईमूग, ज्वारी, बाजरी व मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.हुमणीचे तत्काळ नियंत्रण न झाल्यास पिकाला ३० ते ७० टक्के इतका फटका बसू शकतो.त्यामुळे त्याच्या नियंत्रणावर भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. मोसमी पावसाला सुरुवात होताच हुमणी भुंगे यांचे प्रजनन होत असते.भुंगे पुढे पिकासाठी घातक ठरतात. शेतकऱ्यांनी गाफील राहू नये, सापळे लावावेत, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी दिला आहे.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना याची प्रात्यक्षिक दाखवले जात आहेत.हुमणी किडीच्या अवस्थांची माहिती दिली जात आहे.किडीच्या प्रजननावरच नियंत्रण मिळवणे हा सोपा उपाय आहे.वेळीच नियोजन करणे आवश्यक आहे.यासाठी एकात्मिक व्यवस्थापन गरजेचे आहे. कोळपणीच्या वेळी शेतातील अळ्या वेचून नष्ट कराव्यात. जैविक नियंत्रणावर भर द्यावा. मेटारायझिम ऍनिसोपली हे बुरशीनाशक, फिप्रोनील, इमिडाक्लोप्रीड हे संयुक्त कीटकनाशक वापरावे. शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या २-३ वर्षे अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे असे कृषी विभागाने सांगितले आहे. किमान एका गावात १० शेतकऱ्यांनी दहा-दहा प्रकाश सापळे लावले, तर ५० हजार हुमणी अळ्या आपण नष्ट करू शकतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी गाफील राहू नये, असे आवाहन जेजूरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here