पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामास दि. १५ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. ऊस वाहतूकदार व तोडणीदार यांचे करार झाले असून या हंगामात जास्तीचे ऊस गाळप करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती अध्यक्ष केशवराव जगताप यांनी दिली. कारखान्याने यंदा १४ ते १५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस गाळपास उपलब्ध असलेले एकूण क्षेत्र १८ हजार ७९३ एकर आहे. त्यानुसार ७ लाख ५० हजार मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणार आहे. तर उर्वरित गेटकेनचा ऊस आणावा, असे आवाहन त्यांनी केले. माळेगाव साखर कारखान्याच्या या गाळप हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच ठरलेल्या उद्दिष्टानुसार उसाचे गाळप करण्याचा निर्धार प्रशासनाने केला असल्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सांगितले. त्या अनुषंगाने अंतर्गत मशिनरींची कार्यक्षमता चाचणीदेखील घेतली असून सुरुवातीपासून पूर्ण क्षमतेने गाळप करण्याचा निश्चय पाटील यांनी व्यक्त केला.