‘महिंद्रा अँड महिंद्रा’कडून स्मार्ट हार्वेस्टिंग सोल्युशन्स तंत्रज्ञानाची निर्मिती…

मुंबई : साखर उद्योगासमोरील विविध आव्हानांचा अभ्यास करून त्या आव्हानांच्या सोडवणुकीसाठी जगप्रसिद्ध महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाने, साखर उद्योगासमोरील या आव्हानांचा अभ्यास करून साखर उद्योगासाठी स्मार्ट हार्वेस्टिंग सोल्युशन्स तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. यामध्ये उपग्रह आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा सुरेख वापर करून साखर उद्योगाला पूरक अशा प्रिसिजन ऍग्रीकल्चर तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे.  या तंत्रज्ञानाचा वापर देशातील अनेक प्रमुख साखर कारखाने करत आहेत. आजअखेर १ लाख एकरवर या तंत्रज्ञानाचा वापर करून १५ पेक्षा अधिक कारखान्यांनी त्याचा फायदा घेतला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या Precision Farming Solutions कंपनीसाठी ‘चीनीमंडी’ सल्लागार म्हणून काम पाहत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या Precision Farming Solutions बाबत अधिक माहिती हवी असल्यास आपण 9765999101 (सिमिता मनवानी) या नंबरवर संपर्क करू शकता.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), दूरस्थ संवेदन (Remote sensing) आणि साखर उद्योग

आज जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence ) वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढतो आहे. शेती क्षेत्रातल्या अनेक समस्या एकाच वेळी ओळखण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठीदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल, यावर जगभरात संशोधन सुरु आहे. गूगल, मायक्रोसॉफ्ट, टाटा आणि महिंद्रा यासारख्या अनेक दिग्गज कंपन्या कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय शेतीमधील महत्वाच्या समस्यांवर उपाययोजना शोधण्याचे काम करत आहेत. जगभरात होत असलेल्या हवामान बदलामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. त्याचा परिणाम म्हणून कमी उत्पादकता, किडीचा वाढता प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस यामुळे शेती संकटात सापडत चालली आहे.

जगाची लोकसंख्या २०५० पर्यंत सुमारे १० बिलियन (१००० कोटी) होण्याची शक्यता आहे. त्यावेळी जागतिक अन्नाची मागणी ही आताच्या मागणी पेक्षा ५० टक्के अधिक असेल. सध्याच्या प्रचलित कृषी पद्धतीमध्ये आपण जगाच्या एकूण उपलब्ध पाण्याचा ७० टक्के वापर करत आहोत आणि ४० टक्के रासायनिक खते योग्य पद्धतीने न दिल्याने किंवा केव्हा द्यायचे, किती द्यायचे हे न समजल्याने मोठ्या प्रमाणावर जमीन आणि पाण्याचे प्रदूषण होत आहे. ऊस शेतीमध्ये देखील कमी अधिक फरकाने याच समस्या आहेत.

देशात साखर उद्योगाची आश्वासक उद्योग म्हणून ओळख…

भारतात आज साखर उद्योग हा अत्यंत आश्वासक उद्योग म्हणून ओळखला जात आहे. सध्या इथेनॉल धोरणामुळे साखर उद्योगास नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. साखर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. अनेक कारखाने आज ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरत आहेत. परंतु सप्लाय चेनमध्ये (पुरवठा साखळी) अद्यापही म्हणावा इतका तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. पुरवठा साखळीमध्ये आज ब्राझील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगात १६% साखर उताऱ्यासह आघाडीवर आहे. भारत दुसऱ्या क्रमांकाचा साखर उद्योग असूनही अद्याप साखर उतारा १०.५० ते ११ दरम्यान आहे. महाराष्ट्रात फारशी काही वेगळी परिस्थिती नाही आणि ११.३० साखर उताऱ्यासह आपण अडखळत वाटचाल करत आहोत.

हवामान बदलाचा होणारा सूक्ष्म परिणाम महाराष्ट्राच्या ऊस उत्पादकतेवरही होत असून अवकाळी पाऊस, किंवा यंदासारखी अवर्षण स्थिती यामुळे साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. आजमितीला अपरिपक्व ऊस तोडीमुळे  देशाच्या साखर उताऱ्यात ०.३ ते ०.५ टक्के तोटा होऊन आज एकूण २००० कोटीचे नुकसान साखर उद्योगाचे पर्यायाने देशाचे होत आहे. जगाच्या बाजारपेठेत आज साखर उद्योगास सामोरे जायचे असेल तर त्यांना पुढील आव्हानांचा सामना करून त्यावर जगात उपलब्ध असलेल्या ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यातील काही आव्हानांना निश्चित सामोरे जाता येईल.

साखर उद्योगासमोरील आव्हाने

१. एकूण नोंदणी झालेले क्षेत्राची अचूक माहिती : आज यासाठी अनेक कारखाने ऍपचा वापर करत असले तरीदेखील सध्याच्या वापरात असलेल्या GPS तंत्रामध्ये असलेल्या काही त्रुटीमुळे अचूक क्षेत्राची नोंद होत नाही. एका शेतकऱ्याचे किमान २-५ गुंठे क्षेत्र जरी चुकले तरी २०,००० सभासद नोंदणीमध्ये हा आकडा किमान २००० ते ३००० एकर क्षेत्र चुकीचे नोंदले जाते आणि त्यामुळे त्याचा नियोजनात मोठा फटका बसत आहे.

२. परिपकव ऊसाची तपासणी आणि त्याप्रमाणे तोडणी प्रोग्रॅम बनवणे : आज एका कारखान्याकडे २० ते २५ हजार एकर क्षेत्र नोंदणीसाठी येत असते. प्रत्येक शेतातील ऊसाची परिपक्वता तपासणी करणे हे मोठे जिकिरीचे काम असून त्यात मानवी हस्तक्षेपामुळे त्यात अधिकच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अपरिपक्व ऊसाची तोडणी होऊन साखर उताऱ्यात ०.३ ते ०.५ टक्के इतकी घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

३. प्लॉट निहाय उत्पादकतेची आकडेवारी : क्षेत्रीय स्तरावर आज जुने कर्मचारी आपल्या अनुभवानुसार उत्पादकतेची आकडेवारी देऊ शकतात, परंतु नव्याने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने आणि आवश्यक कौशल्येच्या अभावाने ते अचूक अंदाज देऊ शकत नाहीत. त्यामुळे नोंदणी झालेल्या क्षेत्रातून एकूण किती ऊस येणार आहे,  याची अचूक आकडेवारी शेवटपर्यंत जुळवता येत नाही. त्यामुळेदेखील रिसोर्स प्लांनिंगमध्ये मोठी आव्हाने उभी राहत आहेत.

४. तोडणी झालेल्या आणि तोडणीसाठी सुरु झालेल्या प्लॉटची अचूक माहिती : आज अनेक शेतकरी २-३ कारखान्यांकडे आपला ऊस नोंद करतात. ऊस तोड लांबली तर लगेच दुसऱ्या कारखान्याला ऊस घालतात. त्यामुळे नेमका किती ऊस शिल्लक आहे, याची अचूक माहिती कारखान्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांना मजूर नियोजन करणे शक्य होते.

५. गाव निहाय ऊसाचे क्षेत्र : आज जवळपास सर्वच कारखान्यांना शेजारच्या गावात नेमका ऊस किती आहे याची खात्रीशीर माहिती नसते. त्यामुळे किती ऊस तिथे नोंदला आहे आणि किती ऊस अद्याप नोंद केला नाही याची अचूक माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होते आहे आणि त्याचा नेमका फटका एफआरपी देण्यावर होत आहे.

६. प्लॉट निहाय पिकांवरील आलेला जैविक आणि अजैविक ताण : आज प्रत्येक क्षेत्रीय कर्मचाऱ्याकडे १०० पेक्षा अधिक प्लॉट नोंदणी झालेले असतात. प्रत्येक प्लॉटला प्रत्यक्ष भेट देणे आणि त्यावरील आलेला पाण्याचा अथवा कीड रोगांचा अभ्यास करून मार्गदर्शन करणे शक्य होत नाही. त्यामुळे एकूणच ऊस उत्पादकतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

स्मार्ट हार्वेस्टिंग सोल्युशन्स तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये

१.प्रत्येक आठवड्याला प्लॉट निहाय अचूक परिपक्वतेची माहिती

२.परिपक्वतेनुसार हार्वेस्टिंग प्रोग्रॅम बनविणे आणि त्यानुसार तोडणी प्रोग्राम राबवणे शक्य

.प्लॉट निहाय ऊस उत्पादकतेची अचूक माहिती. त्यानुसार एकूण किती टन ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध होणार, किती बाहेरून आणावा लागणार याची अचूक माहिती.

४.ऑटोमॅटिक फील्ड बॉउंडरी डिटेक्शन तंत्रज्ञान वापरून ऊस शेतीचे अचूक क्षेत्र समजते.

५. उपग्रहाद्वारे ऊसाचे सर्वे करून गाव निहाय एकूण ऊस क्षेत्र किती हे समजते. त्यामुळे आपल्या भागात नोंदणी वाढविण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.

६. प्रत्येक प्लॉटची बायोमास ग्रोथ म्हणजेच वाढीचा अभ्यास करून आलेला जैविक अथवा अजैविक ताण समजतो. शेताच्या कोणत्या भागात ही समस्या आली आहे, हे समजते.

७. उपग्रहाच्या मदतीने आलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करून किती क्षेत्र तोडणी झालेले आहे आणि किती ठिकाणी ऊसतोड सुरु झाली आहे, हे देखील समजते

या तंत्रज्ञानाचा वापर करून काही कारखान्यांनी त्यांच्या साखर उताऱ्यात ०.२ ते ०.३ टक्के इतकी वाढ केली आहे. तसेच ऊस उत्पादकतेची माहिती वापरून आपले ऊस तोडणी नियोजन त्याप्रमाणे केले आहे. भविष्यातील साखर उद्योगासमोरील आव्हाने कमी करण्याचा प्रयत्न कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उपग्रह तंत्रज्ञान वापरून होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here