धाराशिव : अवसायक असलेल्या तेरणा साखर कारखाना व जिल्हा मध्यवर्ती बँकेने तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे तात्काळ द्यावे अशी मागणी तेरणा बचाव संघर्ष समितीने केली. आहे. थकीत देणी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. समितीने बुधवारी जिल्हा बॅकेला याबाबत निवेदन दिले. तेरणा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल वाकुरे, उपाध्यक्ष मंगेश तिवारी यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी हे निवेदन दिले. बँकेचे वित्त विभागाचे सीओ शहाजी पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले.
तेरणा साखर कारखाना गेली दोन वर्षे झाले भैरवनाथ शुगरला चालविण्यास देण्यात आला. भैरवनाथ शुगरने कारखान्यास १२ कोटी रुपये भरून देखील तेरणा साखर कारखान्याचे आवसायक तथा कार्यकारी संचालक यांनी पुढील काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुठलेच देणे आजपर्यंत दिलेले नाही. कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक तथा तेरणा साखर कारखान्याचे अवसायकांनी निवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कारखाना चालू करण्यासंदर्भात सहकार्य करा असे आवाहन केले होते. कारखाना सुरू झाल्यावर तुमचे इतर देणे येणाऱ्या रकमेच्या पंचवीस टक्के रकमेतून देण्यात येईल असे आश्वासन निवृत्त कामगारांना दिले होते. मात्र, त्यानुसार कार्यवाही झालेली नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.