साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन

लखिमपूर खिरी : पलिया साखर कारखान्यात शारदा वर्क्स असोसिएशन आणि शारदा साखर कारखाना कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, असोसिएशनचे महामंत्री निर्भय नारायण सिंह यांनी सांगितले की, चार एप्रिल रोजी प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे २३ मे रोजी पुन्हा कारखाना प्रशासनाला असोसिएशनने स्मरणपत्र दिले. ज्या कर्मचाऱ्यांकडे दोन पदांची जबाबदारी आहे, ती कमी करून एकच करावी, २९ जून २०२२ चा शासन आदेश लागू करावा, इंजिनीअरिंग, प्रॉडक्शन, ड्रायर, ऊस विभाग, सफाई, संरक्षण, फायर फायडिंग अशा विभागातील कर्मचाऱ्यांना कायम करत नियुक्तीपत्र देण्याच्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांच्या पुर्ततेसाठी समितीने कारखाना प्रशासनाला १५ दिवसांची मुदतही देण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. दखल न घेतल्यास बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी कामगार संघाचे अफरोज अहमद अन्सारी, निरज शुक्ला, अरविंद कुमार वर्मा, सिराजुद्दीन, नदीम, राकेश, प्रमोद, संजय, उपेंद्र आदी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here