कोल्हापुरात बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची जिल्ह्यात विशेष मोहिम – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

वार्षिक योजनेचा उपलब्ध निधी 100 टक्के खर्च करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

कोल्हापूर, दि. 27 : जिल्ह्यातील सर्व लघु पाटबंधारे प्रकल्प, पाझर तलाव तसेच कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठीचे सर्वेक्षण येत्या दोन महिन्यात संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावे. त्यानुसार दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देवून जून पर्यंत दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजे येथे बोलताना दिले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळीआमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यजित पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, पुणे विभागाचे उपायुक्त उत्तम चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी समितीचे सन्माननीय सदस्य-सदस्या, अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात पाटबंधारे प्रकल्प, पाझर तलाव तसेच कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेवून आगामी पावसाळ्यात या प्रकल्पांमध्ये अधिकाधिक पाणीसाठा करणाऱ्यावर शासनाने भर दिला असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात पाझर तलाव, लपा बंधारे यासाठी साईट शोधून त्यांचा सर्व्हे करण्याचे कामही अधिकाऱ्यांनी हाती घ्यावे. यासाठी संबंधित भागातील लोक प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचाही सल्ला घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
येत्या वर्षभरात शाळा सुविधायुक्त आणि सुसज्ज करणार-पालकमंत्री जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा येत्या वर्षभरात सर्व सुविधायुक्त आणि सुसज्ज होतील या दृष्टीने जिल्ह्यात शाळ दुरुस्तींची विशेष मोहिम हाती घेतली जाईल, असे सांगूनन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक प्राधान्याने तयार करावे. त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देताना निम्मा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तर निम्मा निधी लोक सहभागातून निर्माण केला जाईल. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील जवळपास 2 हजार शाळा निटनेटक्या, सर्व सुविधायुक्त आणि देखण्या होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्राथमिक शाळांना संरक्षक भिंत उभारण्यावर भर-पालकमंत्री

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना संरक्षक भिंत उभारण्यावरही भर दिला जाईल यासाठी शिक्षण विभागाने सर्व्हे करुन अंदाजपत्रक तयार करावे. त्यानुसार निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची मैदाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विकसित करण्यास प्राधान्य देण्यात येईल, यासाठी तात्काळ प्रस्ताव देण्याची सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

जिल्ह्यात चार निर्मितीचा विशेष प्रकल्प हाती घेणार-पालकमंत्री

जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून या तालुक्यातील जनतेला दुष्काळाच्या सर्व सुविधा आणि सवलती प्राधान्याने उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी ग्वाही देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याच्या अन्य जिल्ह्यात दुष्काळाची गंभीरस्थिती निर्माण झाली असून याभागातील दुष्काळग्रस्तांना सहायभूत होण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात कृषि विभागाच्या माध्यमातून चारा लागवडीचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. कृषि विभागाने जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना चारा लागवड करण्यासाठी प्रोत्साहीत करावे. शेतकऱ्यांनी निर्माण केलेला चारा मार्च-एप्रिलमध्ये दुष्काळाची तीव्रता असताना शेजारच्या सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या जनावरांसाठी उपलब्ध करुन देता येईल, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील 16 क वर्ग तीर्थ क्षेत्र म्हणून मान्यता-पालकमंत्री

जिल्ह्यातील पर्यटन आणि तीर्थ क्षेत्राच्या विकासावर अधिक भर दिला असून श्री जोतिबा मंदिर परिसर विकासासाठी 25 कोटी मंजूर केले असून 5 कोटी प्राप्त झाले आहेत. या निधीतून दर्शन मंडप आणि पार्किंगची कामे हाती घेण्यात येणार असून ही कामे पुढील महिन्यात सुरु होतील. तसेच महालक्ष्मी (करवीर निवासनी श्री अंबाबाई) मंदिर परिसर विकासासाठी 87 कोटीचा प्रस्ताव असून 25 कोटी मंजूर झाले आहेत. यामधून दर्शन मंडप आणि पार्किंग ही कामे हाती घेण्यात येणार असून डिसेंबरमध्ये प्रक्रिया पूर्ण करुन याकामांची सुरुवात होईल. याबरोबरच पंचगंगा घाट सुशोभिकरणाचे कामही गतीने सुरु असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, जिल्ह्यातील 16 क वर्ग तीर्थ क्षेत्रे म्हणून मान्यता देण्यात आली असून यामध्ये भुदरगड तालुक्यातील मुदाळ, पन्हाळा तालुक्यातील परखंदळे, तेलवे, माळवाडी, किसरुळ आणि काखे, गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पूर उर्फ आजरा, करवीर तालुक्यातील हिरवडे दु. कागल तालुक्यातील लिंगणूर दु, पिंपळगाव खु, कुरणी, जैन्याळ, बोळावी, व्हनुर आणि राधानगरी तालुक्यातील सिरवे आणि पुंगाव या गावांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपलब्ध निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या वर्षासाठी जिल्ह्यास 378 कोटी 35 लाख 28 हजाराचा निधी अर्थ संकल्पीय झाला असून शासनाकडून 272 कोटी 99 लाख 86 हजार प्रत्यक्ष निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत 131 कोटी 60 लाखाचा निधी वितरीत केला असून 89 कोटी 15 लाख खर्च झाला आहे. मंजूर निधी 100 त्या त्या योजनांवर खर्च करण्याचे निर्देश याबैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व कार्यान्वित यंत्रणांना दिले. यासाठी दरमहा जिल्ह्याधिकाऱ्यांनी आढावा बैठक घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यंदा जिल्ह्यासाठी अर्थ संकल्पीय झालेल्या 378 कोटी 35 लाखाच्या निधीमध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 263 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 113 कोटी 41 लाख आणि ओटीएसपीसाठी 1 कोटी 90 लाखाच्या निधीचा समावेश आहे. जिल्ह्याला यंदा नाविन्यपूर्णमध्ये 6-7 कोटी असून यासाठीचे नाविन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव 8-10 दिवसात द्यावेत अशी सूचनाही त्यांनी केली.

डेंग्यू व स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधासाठी मोहिम आखा-पालकमंत्री

जिल्ह्यात डेंग्यू व स्वाईन फ्ल्यूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने डेंग्यू व स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहिम हाती घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. या अनुषंगाने आरोग्‍ विभागास लागणाऱ्या सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील नदी काठावरील शेतात मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात असून मगरींचा बंधोबस्त करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यु टिम सातत्यपूर्वक उपलब्ध करुन द्यावी आणि मगरी पकडण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here