नियमांचे उल्लंघन करणाऱे जिल्हा ऊस अधिकारी निलंबित

सुल्तानपूर : नियमांचे उल्लंघन करून लेखा लिपिकास अतिरिक्त पैसे दिल्याप्रकरणी दोषी आढळल्याने जिल्हा ऊस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ऊस तथा साखर आयुक्त कार्यालयाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. जिल्हा ऊस अधिकारी सुनील कुमार यांनी आपल्या अखत्यारितील लेखा विभागाचे लिपिक सुधांशू रंजन त्रिपाठी यांना नियमांचे उल्लंघन करून दोन लाख रुपये अग्रीम मंजूर केले होते.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अग्रीम दिलेल्या रकमेपैकी एक लाख रुपये लिपिक त्रिपाठी यांनी परत केले नाहीत. याशिवाय ऊस विकास परिषदेत लेखा लिपिक सुधांशू रंजन त्रिपाठी आणि मंत्री अतुल प्रकाश सिंह यांच्याकडून ४० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा दुरुपयोग केल्या प्रकरणातही जिल्हा ऊस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. लखनौतील उत्तर प्रदेश सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक मुकेश चंद्र यांनी या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन, ऊस विकास परिषदेत दोनपेक्षा अधिक बँक खाती चालवून कर विभागाचे आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपांना पुष्टी मिळाल्यानंतर राज्यपालांच्या परवानगीने साखर उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर लेखा लिपिक त्रिपाठी आणि मंत्री अतुल प्रकाश सिंह या दोघांचेही निबंलन करण्यात आले आहे. दरम्यान, बस्ती जिल्ह्याचे बियाणे उत्पादन अधिकारी राजेंद्र प्रसाद यांना जिल्हा ऊस अधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here