नवी दिल्ली : देशात ५ लाख कोटी रुपयांची इथेनॉल अर्थव्यवस्था बनविण्याचे माझे स्वप्न आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यामध्ये काहीही अशक्य नाही असे ते म्हणाले. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी ग्रामीण शेती क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सध्या हे क्षेत्र खूप संकटातून वाटचाल करीत आहे, असे ते म्हणाले.
जागतिक डिझाइन विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात बोलताना गडकरी म्हणाले की, ग्रामीण शेती, आदिवासी अर्थव्यवस्था संकटात आहे. बांबूसारख्या अनेक गोष्टींचे मूल्यवर्धन करणे शक्य आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या तुलनेत इथेनॉलची किंमत कमी आहे. आणि हे एक ग्रीन फ्यूएल आहे, त्याचे उत्पादन तांदूळ, गहू आणि उसाच्या रसापासून करता येते.
ते म्हणाले की, उपयुक्त तंत्रज्ञान आणि दूरदृष्टीचा वापर करून टाकावू पदार्थांचे रुपांतर संपत्तीमध्ये केले जावू शकते. त्यांनी पूर्वी इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त साखर साठ्यावर जोर दिला होता. कारण डब्ल्यूटीओअंतर्गत डिसेंबर २०२३ नंतर साखरेवर निर्यात अनुदानाची तरतुद असणार नाही. गडकरी म्हणाले की, सरकार मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. आणि देशात उत्पादित सर्व इथेनॉल खरेदी केले जाईल.