दुष्काळाचे सावट : राज्यात उसाचे उत्पादन 15 ते 20 टक्क्यांनी घटण्याची शक्यता

कोल्हापूर :गेल्या १५ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आजअखेर ३३.८ टक्के कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. मुंबई, कोकण विभागात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी राज्याच्या ऊस पट्ट्यात कोल्हापूर वगळता पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषतः नगर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. त्यामुळे यंदाही उसाचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात पाऊस आणखीन लांबला तर आगामी हंगामात सरासरी 15 ते 20 टक्क्यांनी ऊस उत्पादन घटण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कारखान्यांकडून उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.

कारखान्यांना उसाची टंचाई जाणवणार…

राज्यात गेल्यावर्षी ऑगस्टच्या मध्याला १२३.४ टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ८९.६ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यातील ३२९ गावे आणि १ हजार २७३ वाड्यांना ३५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होते. त्यात यवतमाळ, जळगाव, नगर, सांगली, सातारा जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात दमदार पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. नदीकाठच्या भागातील ऊस पिकाचा जनावरांच्या चान्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. चालू वर्षी कारखान्यांना उसाची टंचाई जाणवणार आहे.

उसाचा चाऱ्यासाठी प्रति टन ४००० ते ४५०० हजार रुपये दर…

पश्चिम महाराष्ट्रातील मंगळवेढासह अनेक तालुक्यामध्ये ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप एकदाही दमदार पाऊस झालेला नाही. पाण्याअभावी ऊस पीक वाळू लागले आहे. जनावरांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. त्यामुळे बहुतांश पशुपालक जनावरांना चारा म्हणून उसाचा वापर करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यात नदीकाठच्या भागातून दररोज शेकडो वाहने उसाची चाऱ्यासाठी वाहतूक करताना दिसत आहेत. सध्या उसाच्या चाऱ्यासाठी शेतकरी प्रति टन ४००० ते ४५०० हजार रुपये मोजत आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा वाढलेला वापर पाहता आगामी गळीत हंगामात साखर कारखान्यांना उसाची कमतरता भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ISMA चाही साखर उत्पादन घटण्याचा अंदाज…

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणाऱ्या नवीन साखर हंगामात देशातील साखरेचे उत्पादन 3.41 टक्क्यांनी घसरून 316.80 लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. साखर उत्पादनात ही घट इथेनॉल उत्पादनासाठी अधिक उसाच्या गरजेमुळे झाली आहे. 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) हंगामात साखरेचे उत्पादन 328 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. प्राथमिक अंदाज जारी करताना, ISMA ने सांगितले की, 2023-24 हंगामामध्ये सुमारे 45 लाख टन साखरेचे उत्पादन इथेनॉलमध्ये रूपांतरित केले जाईल. चालू हंगामात हे प्रमाण 41 लाख टन इतके होते.

राज्यात १५ ते 20 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता : साखर उद्योग तज्ञ पी.जी.मेढे

यंदा राज्यात पावसाअभावी उसाचे उत्पादन साधारणपणे 15 ते 20 टक्क्यांनी घटण्याची शक्यता साखर उद्योग तज्ञ पी.जी.मेढे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, राज्यातील बहुतांश ऊस उत्पादक जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे. त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर होणार असून राज्यात अंदाजे 1000 लाख टन ऊस गाळपास उपलब्ध होईल, असा अंदाजही त्यांनी व्य्ल्त केला. राज्यातील सर्व कारखान्यांची मिळून दैनदिन गाळप क्षमता अंदाजे 9 लाख टन इतकी आहे. याचाच अर्थ आगामी गाळप हंगाम 100 ते 120 दिवसांचाच असू शकेल. उसाच्या कमतरतेचा जबर फटका कारखान्यांना बसण्याची शक्यता मेढे यांनी व्यक्त केली. उसाचे उत्पादन घटल्यामुळे साहजिकच साखरेचे उत्पादन घटणार आहे. त्याचा थेट परिणाम साखरेच्या दरवाढीवर होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here