कोरोनामुळे चीनचा उडाला बोजवारा, जीडीपीचा वेग भारताच्या निम्मा

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा अक्षरशः कहर झाला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जगातील इतर देशांमध्येही भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा फटका सोसणाऱ्या चीनसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. देशाच्या आर्थिक विकास दराची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार वर्ष २०२२ मध्ये चीनचा आर्थिक विकास दर ३ टक्के राहिला आहे. जगातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनसाठी कोरोना विषाणू हे खूप मोठे संकट बनले आहे. २०२२ मध्ये यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आणि रिअल इस्टेट सेक्टरमधील मंदी यामुळे देशाच्या विकासाचा वेग ३ टक्क्यांवर आला आहे. गेल्या चार दशकांतील हा सर्वात कमी आकडा आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटॅस्टिकद्वारे जाहीर करण्यात आलेले आकडे पाहिले तर असे दिसून येते की सरत्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत विकास दर वार्षिक आधारावर २.९ टक्के राहिला. तर यापूर्वीच्या तिमाहीत हा दर ३.९ टक्के होता. चीनने २०२२ मध्ये आर्थिक विकास दर ५.५ टक्के राहील असे उद्दीष्ट ठेवले होते. हे उद्दीष्ट आधीच्या म्हणजे २०२१ च्या वर्षातील ८.१ टक्केपेक्षा खूप कमी होते. मात्र, सरकारच्या धोरणांना कोविडने उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे चीनची बिकट स्थिती झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here