पैसे मिळण्यातील विलंबामुळे ऊस उत्पादक शेतकरी वळले गहू, भात पिकाकडे

82

संगरुर : पंजाबमध्ये ऊस थकबाकीचा मुद्दा खूप गंभीर बनला आहे. साखर कारखान्यांद्वारे वेळेवर ऊस बिले मिळत नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिक सोडून गहू, भाताच्या शेतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. संगरुर आणि मलेरकोटला जिल्ह्यात याचा जास्त परिणाम दिसून आला आहे. येथील ऊसाच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय घट दिसून आली आहे. २०१७-१८ मध्ये या दोन्ही जिल्ह्यांत ३,८१० हेक्टरमध्ये ऊस पिक होते. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये हे लागवड क्षेत्र घटून १,८९४ हेक्टरवर आले. चालू आर्थिक वर्षात हा आकडाही आणखी खालावण्याची शक्यता आहे.

ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, पिक वैविध्यीकरणाला प्रोत्साहन देण्याचे पंजाब सरकारचे सर्व दावे केवळ कागदावरच आहेत. गेल्या काही वर्षात बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी भात, गव्हाच्या शेतीकडे परतले आहेत. धुरीमध्ये एका खासगी साखर कारखान्याकडे थकीत असलेली कोट्यवधी रुपयांची ऊस बिले मिळावीत यासाठी ऊस उत्पादक समितीच्या सदस्यांनी बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. आपले पैसे मिळावेत यासाठी आम्ही सरकारसोबत लढाई करण्यात वेळ वाया घालवू इच्छित नाही, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आणि त्यामुळे ऊस पिकाला पर्याय शोधण्यात येत आहे. धुरी येथील एका खासगी कारखान्याकडे १७.६५ कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्याने आतापर्यंत एकूण थकीत रक्कमेतील ३ कोटी रुपये दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here