अतिरिक्त उसामुळे महाराष्ट्रात अद्याप ३५ साखर कारखान्यांचे गाळप सुरूच

औरंगाबाद : सरत्या आर्थिक वर्षात, २०२१-२२ मध्ये अतिरिक्त ऊस उत्पादनामुळे महाराष्ट्रात अद्याप ३५ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. ऊस गाळप जून महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू राहू शकते, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. अद्याप सहा लाख टन उसाचे गाळप शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की, चांगल्या पावसामुळे २०२१-२२ मध्ये ऊस शेतीचे क्षेत्र १३.६७ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले. आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २.२५ लाख हेक्टर जादा आहे. परिणामी सद्यस्थितीत उत्पादन ३०० लाख टनाच्या उच्च स्तरापर्यंत पोहोचले आहे.

याबाबत नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रात २०० पैकी १६५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला. त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. आणखी सात कारखाने ३१ मेपर्यंत गाळप पूर्ण करतील. तर जालना जिल्ह्यातील घनसांगवी कारखाना १५ जूनपर्यंत गाळप करेल, अशी शक्यता आहे. राज्यात सोमवारअखेर १३१४.५४ लाख टन ऊस गाळप झाल्याचे ते म्हणाले. आता गाळप सुरू असलेल्या ३५ कारखान्यांपैकी २१ मराठवाड्यातील आहेत. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मराठवाड्यातील गाळप क्षमता कमी आहे. राज्यात रविवारपर्यंत तोडणीविना शिल्लक असलेला ऊस ६.६१ लाख टन आहे. मात्र, स्थिती नियंत्रणाखाली आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार ३५ कारखाने अद्याप गाळप करीत आहेत. यामध्ये १२ औरंगाबादमधील, अहमदनगरमधील नऊ, नांदेडमधील आठ, सोलापूरमधील तीन, पुण्यातील दोन आणि अमरावतीमधील एका कारखान्याचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here