नाशिक जिल्ह्यात साखर उत्पादनात द्वारकाधीश कारखाना अव्वल

नाशिक : जिल्ह्यात यंदा तीन सहकारी व दोन खासगी साखर कारखाना मिळून फेब्रुवारी २०२४ अखेर जवळपास १० लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. साखर उतारा ९.९२ टक्के आहे. गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, साखर उत्पादनात सहकारीऐवजी खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली असली तरी कादवा सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यात अव्वल ठरला आहे.

जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात सर्वात प्रथम सटाणा तालुक्यातील दैनंदिन ४००० मेट्रिक टन गाळपक्षमता असलेल्या द्वारकाधीश साखर कारखान्याने २७ फेब्रुवारी २०२४ अखेर ४ लाख ५४ हजार २२५ मेट्रिक टन उसाचे गाळप करत सर्वाधिक ४ लाख १४ हजार १७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या कारखान्याचा साखर उतारा १०.५३ टक्के आहे. त्याखालोखाल ५ नोव्हेंबर २०२३ रोजी गाळप सुरू झालेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याने २ लाख ७२ हजार ३६९ टन उसाचे गाळप करून २ लाख २३ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

कादवाचा साखर उतारा जिल्ह्यात सर्वाधिक ११.९४ टक्के आहे. मालेगाव तालुक्यातील एस. जे. शुगर डिस्टीलरी अँड पॉवर प्रा. लिमिटेडच्या साखर कारखान्यानेही सर्वांत उशिरा म्हणजे दि. १५ नोव्हेंबरला बॉयलर पेटवत १ लाख ६ हजार ९२० मेट्रिक टन उसाचे गाळप करत ९४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

जिल्ह्यातील रानवड साखर कारखाना आमदार दिलीप बनकर यांच्या 3 पुढाकाराने स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेने भाडेतत्त्वावर घेतलेला आहे. ‘रासाका’चा गळीत हंगाम ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झाला. ‘रासाका’ने ८५ हजार ३९ मेट्रिक टन गाळप करत ८३ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल लिमिटेडने भाडेतत्त्वावर घेतलेल्या नाशिक साखर कारखान्याचा गळीत हंगाम दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झाला. या कारखान्याने ६५ हजार ५६३ मेट्रिक टन उसाचे गाळप करत ६१ हजार ५११ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here