पुणे विभागात पावसाअभावी पूर्व हंगामी ऊस लागवडीला फटका

पुणे : यंदा पणे विभागात आतापर्यंत आडसाली, पूर्व हंगामी उसाच्या अवघ्या १ लाख ९ हजार ३९ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. ऑक्टोबर पडलेल्या कडक उन्हामुळे जमिनीत पुरेशी ओल नसल्याने ऊस लागवडीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पुढील नियोजनाकडे पाठ फिरवली आहे. पावसाअभावी पुणे विभागात पूर्व हंगामी ऊस लागवडी खोळंबल्याचे चित्र आहे.

यंदा एक ते २४ जून, त्यानंतर १ ते १८ जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाऐवजी सोयाबीन, मूग, मका या पिकांवर भर दिला. त्यामुळे ऊस लागवडीत घट झाल्याचे दिसते. चांगला पाऊस झाल्यास दरवर्षी याच काळात एक लाख हेक्टर हून अधिक क्षेत्रावर लागवडी होतात. आडसाली उसाच्या लागवडीचा हंगाम संपून पूर्वहंगामी व सुरू उसाच्या लागवडी सुरू होतील. मात्र, त्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. विभागात उसाचे सरासरी क्षेत्र तीन लाख ६१ हजार ५३८ हेक्टर आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर, माढा या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या असल्या तरी विभागात ऊस लागवडीचे प्रमाण कमी आहे.

‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पुणे जिल्ह्यातील पानशेत, पवना, कळमोडी, चासकमान, नीरा देवघर अशी काही धरणे शंभर टक्के भरली. मात्र, उजनीत पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण भरले असले तरी मुळा धरणांत ८० टक्के पाणीसाठा आहे. परंतु इतर धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी जलसंपदा विभाग पुढाकार घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here