नई दिल्ली : राजधानी दिल्लीत गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. राष्ट्रीय भूकंपशास्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तिव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नवी दिल्लीच्या उत्तर पश्चिम दिशेला २.८ ते आठ किलोमीटर अंतरावर होता. यापूर्वी २६ जानेवारी रोजी दक्षिण-पूर्व दिल्लीला भूकंपाचे झटके बसले होते, त्याची तिव्रता १.९ रिश्टर स्केल होती. २२ जानेवारी रोजीही याच तिव्रतेचा भूकंप आला होता.
एनसीएसच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, दिल्ली आणि परिसरातील २०० किलोमीटरच्या अंतरात गेल्या वर्षभरात एकूण ५१ लहान-मध्यम तिव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या दिवशीही २.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यापूर्वी १७ डिसेंबर रोजी दिल्ली – एनसीआरच्या लोकांना भूकंपाचे झटके अनुभवावे लागले होते. त्याची तिव्रता ४.२ टक्के होती.
एनसीएस करतेय खास सर्व्हे
गेल्यावर्षी आलेल्या भूकंपांनंतर एनसीएसने दिल्ली-एनसीआरमध्ये भूभौतिकीय सर्वेक्षण सुरू केले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हालचाली आणि त्रुटींची नोंद घेण्यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून घेण्यात आलेली छायाचित्रे आणि भूगर्भातील तपासणी याचे विश्लेषण करण्यात येत आहे. हे दोन्ही सर्व्हे ३१ मार्चपर्यंत पूर्ण होतील. भूकंप आणि त्याच्या धक्यांच्या नोंदींसाठी ११ ठिकाणी अतिरिक्त तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या स्टेशन्समधून रिअल टाइम डेटा उपलब्ध होत आहे.
मोठ्या भूकंपाची शक्यता
दिल्ली-एनसीआर परिसर भूकंपाच्या श्रेणींमध्ये संवनदशील ४ झोनमध्ये येतो. २०१४ मध्ये एनसीएसने येथील परिसराचा सूक्ष्म अभ्यास केला होता. त्यानुसार, राजधानीचा ३० टक्के हिस्सा झोन ५ मध्ये आहे, जो भूकंपाविषयी अधिक संवेदनशील मानला जातो. डेहराडून स्थित वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीचे संचालक डॉ. के. सेन यांनी एनसीआर परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. हे धक्के मोठ्या भूकंपाचे कारण बनू शकतात असा इशारा याआधीच दिला आहे.