नवी दिल्ली : आर्थिक संकटामुळे पाकिस्तान सरकारने बुधवारी महागड्या आणि गरजेच्या नसलेल्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रोकड टंचाईशी झुंज देत असलेल्या पाकिस्तानने परकीय चलन साठा घटल्याने हे पाऊल उचलल्याचे वृत्त एका प्रसार माध्यमाने दिले आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, जिओ न्यूच्या हवाल्याने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गरजेच्या नसलेल्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लावले आहेत. सर्वसामान्य लोक वापरत नसलेल्या वस्तूंचा यात समावेश आहे. डॉलरच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे की, अमेरिकन डॉलरमध्ये काही आठवड्यांपूर्वी उच्चांकी वाढ झाली आहे. खुल्या बाजारात आज डॉलर २०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आर्थिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा विश्वास खालावला आहे. पाकिस्तान व्यापार परिषदेचे (पीबीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी एहसान मलिक म्हणाले की, इंधन, भोजन, मशीनरी, रसायन, औषधे यांची आयात गरजेची आहे. इतर घरगुती वस्तू आणि निर्यातीसाठीच्या साहित्याची गरज आहे. यात कापूस, मानव निर्मिती फायबरचा समावेश होतो. जर ५ टक्के गरजेचा भाग वगळला तर आयात निर्बंधाचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार नाही.