फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी मुकाद्मांच्या मालमत्ता जप्त करण्याचा प्रयत्न : पोलीस अधीक्षक

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत ऊसतोड मुकाद्मांकडून ऊस वाहतूकदार आणि साखर कारखानदारांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना लक्षणीय वाढल्या आहेत. त्यामुळे ऊस वाहतूकदार आणि कारखानदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी साखर कारखानदारांची फसवणूक करणाऱ्या मुकाद्मांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले की,  जिल्ह्यात ऊस वाहतूकदार आणि साखर कारखानदारांची सुमारे 68 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फसवणुकीला आळा घालण्यासाठी पोलीस संबंधित मुकाद्मांच्या  मालमत्ता जप्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत. गेल्या काही महिन्यांत 798 गुन्हे दाखल करण्यात आले असून, कंत्राटदार, मजूर अशा 1,110 संशयितांचा त्यात समावेश आहे.

ऊस तोडणी मजुरांशिवाय ऊस वाहतूकदार आणि साखर कारखानदारी चालू शकत नाही. ऊस तोडणी मजुरांची गरज लक्षात घेऊन ऊसतोड मजुरांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी मजूर पुरवठ्यासाठी वाहतूकदार व साखर कारखानदारांकडून लाखो रुपयांची उचल घेऊनही वेळेत मजूर पुरवठा केलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील ऊस वाहतूकदार व साखर कारखानदारांचे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे पंडित यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here