बीड : माजलगाव तालुक्यात हंगाम सुरू होऊन चार महिने उलटले आहेत. परिसरातील तीन साखर कारखान्यांनी आतापर्यंत अठरा लाख टन उसाचे गाळप केले आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातील ऊसतोड मजूर देखील दाखल झाले आहे. त्यामुळे गाळप हंगाम दहा ते पंधरा दिवस चालण्याची शक्यता आहे. तालुका परिसरात उपलब्ध असलेला ऊस मराठवाड्यातील अनेक कारखाने ऊस घेवुन जात आहेत.
तालुक्यात लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना तर पवारवाडी येथील खासगी जय महेश साखर कारखाना अशा तीन साखर कारखान्यांसह छोटे- मोठे गुऱ्हाळ व गूळ पावडर निर्मिती कारखाने सुरू आहेत. यंदा दु्ष्काळी स्थितीमुळे दरवर्षी पेक्षा कमी प्रमाणात यावर्षी ऊस गाळपास उपलब्ध होता. पवारवाडी येथील जय महेश कारखान्याने आठ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ऊस गाळप कारखान्याने केल्याची माहिती मुख्य शेतकी अधिकारी सुजय पवार यांनी दिली. सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने पाच लाख ९० हजार टन तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चार लाख ६ हजार ५०० टन उसाचे गाळप आतापर्यंत केले आहे.