मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचा दौरा करणार आहेत. ३० जुलैपासून मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू होत आहे. त्याअंतर्गत ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांचा आढावा घेणार आहेत. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नवभारतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या दौऱ्यात मुख्यमंत्री औरंगाबाद, सिलोड, येवला, वैजापूर पुणे परिसरातील स्थानिक पातळीवरील समस्या ऐकून घेणार आहेत. यादरम्यान शिंदे प्रत्येक जिल्ह्यातील समस्या आणि विकासकामांचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत. याबाबत शिंदे मोठी घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे. याशिवाय ते आमदार अब्दुल सत्तार यांच्या परिसरात सभेलाही संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे या दौऱ्यातून जनतेचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे यांचा मुंबईबाहेरचा हा पहिलाच दौरा आहे. आपल्या सरकारला जनतेचा प्रतिसाद काय आहे, हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.