हैदराबाद : विधानसभा निवडणुकीचा बिगुल थोडा लवकरच आणि जोरदार वाजवत तेलंगणा कॉंग्रेसने बंद पडलेला साखर कारखाना सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यासोबतच एकाच वेळी दोन लाख रुपयांचे पिक कर्ज माफ करण्याची आणि भाताची एमएसपी वाढवण्याची घोषणा केली आहे.
शुक्रवारी राहुल गांधी यांच्या सोबत झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत याबाबत घोषणा करताना तेलंगणा कॉंग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, मनरेगा योजने अंतर्गत नोंदणीकृत भूमीहीन मजुरांना दरवर्षी १२,००० रुपये दिले जाणार आहेत. एमएसपीवर भात, कापूस, मिरची, ऊस, हळद, आंबा यासह राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्व पिकांची खरेदी केली जाईल. यावेळी करण्यात आलेल्या इतर घोषणांनुसार शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले जातील, नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी चांगली पिक विमा योजना, नुकसानीची पाहणी आणि भरपाई त्वरित करणे आदी गोष्टींचा समावेश आहे. या योजनेत कास्तकार शेतकरी आणि भूमीहीन मजुरांचा समावेश आहे. बनावट बियाणे आणि किटकनाशकांचा धोका संपवण्यासाठी नवा कायदा तयार केला जाईल, आणि प्रभावीत शेतकऱ्यांना पीडी अधिनियमाच्या अंतर्गत सहभागी संघटना आणि व्यक्तींची संपत्ती जप्त करुन भरपाई दिली जाणार आहे.