कॉग्निझंट आयटी कंपनीतून हजारो कर्मचाऱ्यांची कपात

जोशेल मेंडोंका, बेंगळुरू: अमेरिकन आयटी कंपनी कॉग्निझंट आगामी काही महिन्यांत कॉस्ट कटिंगच्या नावाखाली सात हजार मध्यम-वरिष्ठ कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. आगामी काही महिन्यांत जगभरातून १२ हजार मध्यम आणि वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतल्याचंही कंपनीनं सांगितलं.

कर्मचाऱ्यांचा विरोध थंड करण्यासाठी कंपनीनं पुढच्या चार महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांना कंत्राटावर कामावर ठेवलं आहे. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्यानं कर्मचाऱ्यांनी काही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ही परिस्थिती केवळ एकाच कंपनीपूर्ती नसून सध्या एकामागोमाग एक आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना अशा नोटीसा पाठवत असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्तीचा पगार द्यावा लागतो, याउलट नव्या कर्मचाऱ्यांकडून कमी पगारातही कामं करुन घेता येतात, म्हणून कंपनीने हे पाऊल उचलल्याचे फोरम फॉर आयटीने म्हटले आहे. यापूर्वी मे मध्येही कंपनीने कॉस्ट कटिंगच्या नावाखाली मध्यम पदावरील अधिकाऱ्यांना नारळ दिला होता. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीच्या कामगिरीत चांगली सुधारणा झालेली आहे. एकूण महसूल ४.२५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ४.१४ अब्ज डॉलर इतका होता.

कॉग्निझंटचे नवे सीईओ ब्रायन हम्फ्रिज यांनी गेल्या काही दिवसांत कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी पुनर्गठणची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी कॉस्ट कटिंगचा मार्ग स्वीकारला होता. या कंपनीत जवळपास २.९ लाख कर्मचारी काम करतात. त्यात जवळपास दोन लाख कर्मचारी हे भारतीय आहेत. ३० सप्टेंबर २०१९ रोजी कंपनीत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २,८९,९९० होती. तर ३० जून २०१९ रोजी कंपनीत एकूण २,८८,२०० कर्मचारी होते.

पर्सिस्टंट, टेक महिंद्रा, विप्रो अशा अनेक कंपन्यानी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. ही कपात कधी परफॉर्मन्सचं, तर कधी आर्थिक मंदीचे कारण देऊन केली जाते. दरम्यान, पुढच्या 2 वर्षांत अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते अशी भीती फोरम फॉर आयटीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here