इथेनॉल मिश्रण धोरण: पंतप्रधान उद्या शेतकरी आणि साखर कारखानदारांशी साधणार संवाद

नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनी, ५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी इथेनॉल मिश्रण धोरणावर ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगाशी संलग्न लोक, साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक आदींसोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत. ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने देशातील सर्व साखर कारखाने, डिस्टिलरीजना ही माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट ठेवले आहे. सरकारने महागड्या तेलावर असलेले देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी २०२३ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा साखर उद्योगाला होणार आहे. कारण, साखर कारखान्यांना अतिरिक्त साखर, आर्थिक तरलतेच्या अडचणींपासून मुक्तता मिळेल. कारखानदार शेतकऱ्यांना ऊस बिल वेळेवर देऊ शकतील. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल. २० टक्के इथेनॉल मिश्रण योजनेसाठी या क्षेत्रात सुमारे ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधणार आहेत.

हा कार्यक्रम डीडी चॅनल अथवा डीडी न्यूज लाइव्हद्वारे यूट्यूब चॅनलवरदेखील पाहता येणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here