इथेनॉलच्या खरेदी दर वाढीने, साखर उद्योगाला दिलासा

नवी दिल्ली : चीनी मंडी

साखरेच्या संभाव्य उच्चांकी उत्पादनामुळे चिंतेत असलेल्या साखर उद्योगाला थोडा दिलासा मिळाला आहे. सरकारने थेट उसाच्या रसापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात तब्बल २५ टक्क्यांची वाढ केल्याने साखर उद्योगाकडून त्याचे स्वागत होत आहे.

आगामी साखर हंगामात भारतात ३५५ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भारतातील आजवरचे हे विक्रमी साखर उत्पादन असणार आहे. त्याचवेळी गेल्या वर्षभरात साखरेच्या दरात १८ टक्क्यांची घट झाली आहे. भारत आणि थायलंडमध्ये झालेल्या अतिरिक्त साखर उत्पादनामुळे जगातिक बाजारातही साखरेचे दर २० टक्क्यांनी घसरल्याचे सरकारच्या जून महिन्याच्या अहवालात म्हटले आहे.

साखर कारखान्यांना साखरेकडून इथेनॉल उत्पादनाकडे वळवल्याने आता इथेनॉलचे उत्पादन साखरेच्या बरोबरीने होण्याची शक्यता, आयसीआरए संस्थेचे विश्लेषक सब्यासाची मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर रेणुका शुगर्स लिमिटेडचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी म्हणाले, ”गेल्या अनेक दिवसांपासून साखर उद्योगाला या निर्णायाची प्रतीक्षा होती. आता साखर कारखान्यांसाठी इथेनॉलचे उत्पादन एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. या निर्णयामुळे साखरेचे उत्पादन सात ते साडे सात लाख टन कमी होण्याचा अंदाज आहे.” त्यामुळे स्थानिक बाजारातील रिटेल मार्केटमध्ये घसरलेले साखरेचे दर नियंत्रणात येतील.

दोन किलो उसाच्या रसापासून एक लिटर इथेनॉल तयार होते. इथेनॉलची सध्याची किंमत साखरेच्या दराच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच, २३ ते २४ रुपये लिटर आहे. आतापर्यंत उसाच्या रसापासून साखर निर्मिती झाल्यानंतर उरलेली मळी इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जायची. आता थेट उसाच्या रसापासूनच इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना उत्पन्नाचा आणखी एक स्रोत मिळेल. अर्थात त्याचे चांगले परिणाम दिसण्यासाठी आणखी एक वर्षाचा अवधी जाणार आहे. कारण, साखर कारखान्यांना त्यांची इथेनॉल निर्मिती क्षमता वाढवावी लागणार असल्याचे मत त्रिवेणी इंजिनीअरिंग इंडस्ट्रिजचे तरुण सावहेनी यांनी स्पष्ट केले. सरकारने इंधनात १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करण्यात साखर उद्योगाला आजवर अडथळे येत होते. ते आता दूर होतील, अशी अशा साखर उद्योगाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here