भोगावती डिस्टलरीसह इथेनॉल प्रकल्प सुरू करणार : आ. पी. एन. पाटील

कोल्हापूर : भोगावती कारखाना सुरळीतपणे मार्गावर आणण्यासाठी आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्हाला कोणाचेही वावडे नाही. आगामी काळात कारखाना डिस्टलरीसह इथेनॉल प्रकल्प सुरू करणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील यांनी केले. भोगावती कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुकली येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात
ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पांडुरंग पाटील होते.

आमदार पाटील म्हणाले की, भोगावती साखर कारखाना लवकरच कर्जमुक्त होणार आहे. डिस्टलरीसह इथेनॉल प्रकल्पही सुरू केला जाईल. सभासदांनी अपप्रचाराला बळी पडू नये. कारखाना चालवताना काटकसर व पारदर्शक कारभार करत तारेवरील कसरत केली आहे. कोणतीही उपपदार्थ निर्मिती नसताना आर्थिक अडचणीतील कारखाना सक्षमपणे चालवला आहे.

उपाध्यक्ष उदयसिंह पाटील व संचालक प्रा. शिवाजीराव पाटील यांनी विरोधक खोटे आरोप करून सभासदांची दिशाभूल करत आहेत. अपप्रचाराला सभासदांनी बळी पडू नये, असे सांगितले. गेल्या सहा वर्षांत कारखान्याचा कारभार सभासद व कर्मचारी हिताचाच केला आहे, असे ते म्हणाले. संचालक प्रा. सुनील खराडे यांनी स्वागत केले. जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, बाळासाहेब खाडे, नामदेव पाटील, संदीप पाटील, साताप्पा पाटील, शिवाजीराव तळेकर, शंकरराव पाटील, बबन रानगे, रोहित पाटील आदी उपस्थित होते. संचालक पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here