नवी दिल्ली : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय नव्या इथेनॉल वापर धोरणावर काम करत असून, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचा वापर, अनुदानाची रचना आणि पुरवठा साखळी यांचा अभ्यास सुरू आहे. सरकारी तेल विपणन कंपन्या (ओएमसी) पेट्रोल पंपांवर ‘इथेनॉल एटीएम’ उभारण्याच्या संकल्पनेचाही अभ्यास करत आहेत. या संकल्पनेनुसार, विद्यमान पेट्रोल पंपांवरच इथेनॉल भरण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते. ग्राहक विशेष प्रकारच्या स्टोव्हसाठी इथेनॉल भरू शकतील. त्यामुळे स्वतंत्र वितरण व्यवस्था उभारण्याची गरज कमी होऊ शकते. मात्र, ही संकल्पना अद्याप विचाराधीन आहे. केंद्र सरकार स्वयंपाकासाठी इथेनॉलचा वापर सुरू करण्याचे धोरण तयार करत असून, त्याचा मसुदा सप्टेंबरपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. या योजनेत इथेनॉलला एलपीजीचा पर्याय नव्हे, तर पूरक इंधन म्हणून स्थान दिले जाणार असल्याची माहिती आहे.
सध्या देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता २,००० कोटी लिटर आहे. तर ई-२० पेट्रोल मिश्रणासाठी वार्षिक गरज १,१०० कोटी लिटरची आहे. त्यामुळे सुमारे ७०० कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे स्वयंपाकासाठी एलपीजीसोबत इथेनॉलचा पर्यायी पर्याय उपलब्ध होऊ शकतो. ऊस व धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादकांना नवीन बाजारपेठ मिळू शकते. देशाचे आयातीत एलपीजीवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. योजना लागू होण्यापूर्वी स्टोव्हची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि अनुदानाबाबत सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. देशाची वार्षिक इथेनॉल उत्पादन क्षमता २० अब्ज लिटरपेक्षा अधिक झाली आहे. मात्र, सध्याची मागणी त्यापेक्षा कमी असल्याने मोठी अतिरिक्त क्षमता निर्माण झाली असून त्याच्या वापराचा प्रश्न आहे. त्यामुळे देशांतर्गत उपलब्ध इथेनॉलचा वापर वाढवण्यावर सरकार भर देत आहे.


















