शाहू कारखान्याच्या इथेनॉल व सहवीज निर्मिती प्रकल्पांचे विस्तारीकरण पूर्ण: समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : कागल येथील शाहू साखर कारखान्याने एकाच हंगामात चार प्रकल्पांचे काम नियोजित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केले आहे. कारखान्याने या हंगामात सल्फरलेस साखर व शाहू पोटॅश या दोन नवीन प्रकल्पांची उभारणी पूर्ण झाली. तर इथेनॉल व सहवीज निर्मिती या प्रकल्पांचे विस्तारीकरणही पूर्ण झाले. नियोजनबद्ध कामाची परंपरा कारखान्याने जपताना आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कारखान्याच्या को-जनरेशन विस्तारीकरण प्रकल्प अंतर्गत नवीन उभारलेल्या ७५ टनी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा घाटगे व त्यांच्या पत्नी नवोदिता यांच्या हस्ते विधिवत झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीच्या पूरक धोरणाचा फायदा घेण्यासाठी कारखान्याची इथेनॉल निर्मिती क्षमता दैनंदिन १ लाख ८० हजार लीटरपर्यंत वाढवली आहे. सहवीज प्रकल्पाची क्षमता २१.५ मेगावॅटवरून ३४ मेगावॅट अशी केली आहे. यावेळी सिटसन इंडिया कंपनीचे प्रतिनिधी प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र दळवी, जनरल मॅनेजर मलिक नदाफ यांचा कारखाना नवीन बॉयलरचे काम वेळेत व यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील आदी उपस्थित होते. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here