सोमेश्‍वर साखर कारखान्याची विस्तारवाढ करु: अजित पवार

सोमेश्‍वर (पुणे) : रामराजे नाईक-निंबाळकर व इतरांची मध्यस्थी घेवून साखरवाडी कारखाना (ता. फलटण, जि. सातारा) घेवून सोमेश्‍वरचे युनिट क्रमांक दोन करण्यासाठी प्रयत्न करु. सभासदांना विचारुन ते फायद्याचे होणार नसेल, तर आपल्याला सोमेश्‍वर कारखान्याची विस्तारवाढ करु, असा प्रस्ताव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासद शेतकर्‍यांपुढे मांडला.

येथील सोमेश्‍वर कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगामाचा प्रारंभ व गव्हाणपूजनाचा कार्यक्रम पवार यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते होते.

शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान आणि राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी आठ हजारांची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आदी खर्च कसा भागणार? यासाठी पुन्हा राज्यपालांकडे शिष्टमंडळ नेवून मुदतवाढ करण्याची विनंती करुन केंद्र सरकारने अधिक मदत करावी अशी मागणी करु, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच डिस्टलरीची विस्तारवाढ, कामगार वसाहतीचे बांधकाम आणि दीवाळीला जादा साखर वाटप या कामाबाबतही पवार यांनी समाधान व्यक्त केले.

प्रस्ताविक पुरुषोत्तम जगताप यांनी केले. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी आभार मानले. यावेळी आम. दत्तात्रय भरणे, संजय जगताप, मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांच्यासह सतीश काकडे, रामचंद्र भगत, रघुनाथ भोसले, बबन टकले, डॉ. दिगंबर दुर्गाडे, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, संग्राम सोरटे, भाउसाहेब करे, माणिक झेंडे, दत्ता झुरंगे, प्रदीप पोमण, अमृता गारडे, नीता फरांदे, मनेका मगर आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here