साखर उद्योगाला यंदाही चांगल्या निर्यातीची अपेक्षा

58

नवी दिल्ली : यंदाचा, २०२१-२२ हा उसाचा गळीत हंगाम साखर उद्योगासाठी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. यंदा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही बाजारपेठेतील साखरेच्या किमतीत तेजीमुळे साखर उद्योगाला सरकारी अनुदानाशिवाय चांगल्या निर्यातीची अपेक्षा आहे.

यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, इथेनॉलवर भर देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय या उद्योगासाठी गेम चेंजर ठरला आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारी मदत अथवा अनुदानाशिवाय स्वतंत्र पद्धतीने काम करणे शक्य आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने तेल वितरण कंपन्यांकडून इथेनॉल खरेदी करण्याच्या दरातही वाढ केली आहे. हे स्वागतार्ह पाऊल आहे असे नाईकनवरे यांनी म्हटले आहे.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नाईकनवरे म्हणाले, यंदा ३४ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी डायव्हर्ट केली जाऊ शकते. गेल्यावर्षी २२ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळविण्यात आली होती. इथेनॉलसाठीची बिले पंधरा दिवसात दिली जातील. साखरेच्या किमती स्थिर नाहीत. मात्र इथेनॉलचे दर निश्चित आहेत, असे नाईकनवरे म्हणाले. कारखान्यांना इथेनॉल विक्री करण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. सर्व इथेनॉल इंधन वितरण कंपन्या घेत आहेत.

सद्यस्थितीत देशात इथेनॉल उत्पादन क्षमता ४५६ कोटी लिटर आहे. भारतामध्ये या हंगामाच्या अखेरपर्यंत इंधनात १० टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण करू शकतो. नाईकनवरे यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही २०२४-२५ मध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट गाठू तेव्हा, ६० लाख टन साखर कायमस्वरूपी इथेनॉल उत्पादनाकडे वळवली जाईल. साखर उद्योगासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असेल. मात्र काही सहकारी साखर कारखाने इथेनॉल उत्पादन सुरू करण्यासाठी अर्थपुरवठा मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. २०१४ नंतर सरकारने इथेनॉल उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी व्याज सवलत योजनेची घोषणा केली होती. आतापर्यंत बँकांनी ५२ कारखान्यांना आर्थिक पुरवठा केला आहे. यात १५ सहकारी कारखाने आहेत. हा मुद्दा आम्ही अर्थ मंत्रालयासह नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयासमोरही मांडला आहे असे नाईकनवरे यांनी सांगितले.
ते म्हणाले, देशात ३१५ लाख टन साखरेचे उत्पादन होते. त्यापैकी या हंगामात ३४ लाख टन इथेनॉल उत्पादनाकडे वळविली जाईल. साखरेच्या किंमतीमधील तेजी पाहता उद्योगाकडून या हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीची अपेक्षा आहे.

नाईकनवरे म्हणाले, आम्ही अफगाणिस्तान आणि श्रीलंकेची महत्त्वपूर्ण बाजारपेठ गमावली आहे. मात्र, नव्या बाजारपेठांत प्रवेश करण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here