येत्या हंगामात ५० लाख टन साखर निर्यात; केंद्रापुढे प्रस्ताव

नवी दिल्ली : चीनी मंडी

चालू हंगामात झालेले उच्चांकी साखर उत्पादन आणि चांगल्या ऊस उत्पादनामुळे येत्या हंगामातही होणारे विक्रमी साखर उत्पादन यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतात जवळपास ३५० ते ३५५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने येत्या हंगामात ५० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अन्न पुरवठा मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

या संदर्भात अन्न पुरवठा मंत्रालयाने केंद्रीय मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवला असून, मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सध्या देशांतर्गत बाजारपेठे साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी वाढू लागली आहे. या सगळ्यावर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून साखर उद्योग सावरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवला आहे. त्यात निर्यात करणाऱ्या साखर कारखान्याला गाळप झालेल्या उसाला प्रति टन १४० रुपये थेट अनुदान, तर निर्यातीसाठी प्रति टन अडीच ते तीन हजार रुपये वाहतूक अनुदान देण्याचा मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. समुद्र किनाऱ्याच्या भागातील उसाला अडीच हजार, तर इतर भागांसाठी सुमारे तीन हजार रुपये वाहतूक अनुदान देण्याचा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा विचार आहे.

येत्या बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यातीनंतर भारतात साखरेचे दर सावरतील आणि स्थीर होतील, अशी अपेक्षासाखर उद्योगाला आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here