क्विंटलमागे 450 रुपयांचा कारखान्यांना होतोय तोटा

माळीनगर (सोलापूर) :
साखर कारखाने सध्या आर्थिक संकटात आहेत. साखर कारखाने टिकणे गरजेचे आहेत. अन्यथा त्यांची अवस्था मुंबई सोलापूरच्या सूत गिरण्यांसारखी होईल, असे प्रतिपादन दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांनी केले.

ते म्हणाले, साखरेचा उत्पादन खर्च व साख़रेला मिळणारा दर यामध्ये मोठी तफावत आहे. यामुळे कारखान्यांना क्विंटलमागे 450 रुपयांचा तोटा होत आहे. राज्यातील साखर उद्योग टिकण्यासाठी केंद्र सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत 3500 रुपये करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

ते म्हणाले, प्रति क्विंटल साखरेचा उत्पादन खर्च 3500 ते 3600 आहे. तर केंद्राने निश्‍चित केलेला दर 3100 आहे. पण हा दर साखरेला मिळत नाही. त्यामुळे कारखान्यांना 3020 ते 3050 या दराने साखर विकावी लागते. त्यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत अडकले आहेत. परिणामी गेल्या सात ते आठ वर्षांपासून राज्यातील अनेक कारखाने 50 ते 60 कोटी रुपयांनी तोट्यात गेले आहेत. यंदा इथेनॉलमुळे तोंटा थोडाफार भरुन येईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

सध्या अशा गंभीर विषयावर बोलायला कोणताही लोकप्रतिनिधी, मंत्री तयार नाहीत. केंद्र सरकारने मध्यंतरी साखरेची एमएसपी 3300 रुपये करण्याची घोषणा केली होती, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे साखर उद्योग डबघाईला येत आहे. कारखान्यांची आर्थिक स्थिती अधिकच कमजोर होत आहे. यासाठी केंद्र सरकारने ठोस उपास करणे आवश्यक असल्याचे राजेंद्र गिरमे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here