उत्तर प्रदेशात साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची कारखान्यांची मागणी

लखनौ : उसाची रास्त आणि लाभदायी किंमत (एफआरपी) १५ रुपयांनी वाढवून ३०५ रुपये प्रती क्विंटल करण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांच्या मालकांनी किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढवण्याची मागणी केली आहे.

याबाबत टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेश शुगर मिल्स असोसिएशनने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एमएसपी वाढवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दरवाढ केल्यामुळे ऊस उत्पादकांना बिले देण्यात होत असलेला विलंब कमी होवू शकेल असे कारखानदारांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने ५ ऑगस्ट रोजी योगी यांना पाठवलेल्या पत्रात असोसिएशनने म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून साखरेचा सध्याचा ३१ रुपये प्रती किलो एमएसपी कायम आहे, तर साखरेची सरासरी एक्स-फॅक्टरी किंमत ३३ रुपये झाली आहे.

याबाबत असोसिएशनने सांगितले की साखर उत्पादनाचा खर्च प्रती किलो ३६-३७ रुपयांपर्यंत गेला आहे. हा दर जो साखरेच्या सरासरी एमएसपीपेक्षा कमी आहे. असोसिएशनच्या पत्रात म्हटले आहे की राज्य सरकारांसह, नीती आयोग, सचिवांची समिती, मंत्रिस्तरीय उपसमिती आणि कृषी खर्च आणि मूल्य आयोग (CACP) यांनीदेखील साखरेच्या विक्री किंमतीत वाढ करण्याची शिफारस केली होती. उत्तर प्रदेशात, उसाची किंमत राज्य सल्लागार किंमत (एसएपी) द्वारे निर्धारित केली जाते. ही किंमत सध्या एफआरपीपेक्षा खूप जास्त आहे. कारखानदारांनी सांगितले की एमएसपीमध्ये वाढ केल्याने उद्योगाला उसाची थकबाकी वेळेवर देण्यास मदत होईल.

आगामी ऊस गाळप हंगामापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट जलद करण्याचेही यूपी सरकारचे उद्दिष्ट आहे. आता नवा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here