पुणे-अहमदनगरमधील कारखाने जादा दर देतात, मग कोल्हापूरचे का नाही !

कोल्हापूर : पुणे-अहमदनगरमधील आठ कारखाने ऊस दर देण्यात ठरले राज्यात भारी ठरले आहेत. गेल्या हंगामातील उसाला पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त दर दिला आहे. पुणे-अहमदनगरमधील कारखान्यांना जमते, मग कोल्हापूर जिल्ह्यतील साखर कारखान्यांना का जमत नाही, असा सवाल उपस्थित करत कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी अधिक ऊस दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांनीही उसाला प्रति टन एफआरपी आणि अतिरिक्त ४०० रुपये जादा दर देण्याची मागणी केली आहे.

माळेगाव (ता. बारामती) कारखान्याने ५६४ रुपये, सोमेश्वर (ता. बारामती) साखर कारखान्याने ४९६ रुपये, विघ्नहर (ता. जुन्नर) साखर कारखान्याने ३२८ रुपये, प्रसाद शुगर्स (ता. राहुरी) कारखान्याने १७७ रुपये, पद्मश्री विखे-पाटील (ता. राहाता) कारखान्याने ३५६ रुपये, सहकार महर्षी थोरात (ता. संगमनेर) कारखान्याने १२१ रुपये, गणेश सहकारी साखर कारखान्याने (ता. राहाता) ४०७ रुपये आणि शंकरराव कोल्हे (ता. कोपरगाव) कारखान्याने २५२ रुपये एफआरपीपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. आठ कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रती टन १२१ ते ५६४ अशी रक्कम दिली आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी आंदोलने सुरू होवूनही पैसे देण्याची भूमिका घेतलेली नाही.

एफआरपीची रक्कम देऊन शिल्लक राहिलेल्या पैशापैकी ७० टक्के ऊस उत्पादकांना आणि ३० टक्के कारखाना व्यवस्थापनासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने आम्ही ४०० रुपये देऊ शकत नाहीत, असे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे म्हणणे आहे. याबाबत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, दरवर्षी माळेगाव, सोमेश्वर साखर कारखाने प्रत्येक वर्षी टनाला पैसे देण्यात शंभर ते दीडशे रुपयांनी कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा मागे असतात. यावेळी त्यांनी एफआरपीशिवाय दुसरा हप्ता म्हणून चारशेपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. याविषयी आमचे आंदोलन तीव्र केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here