शेतात ऊस असेपर्यंत कारखाने सुरू राहणार : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ : जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये ऊस असेल, तोपर्यंत साखर कारखाने सुरू राहतील. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्राम समित्यांच्या समन्वयाने काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करत कोरोना महामारीच्या कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांनी राज्याची अर्थव्यवस्था सांभाळल्याचे सांगितले. गेल्या गळीत हंगामाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान होऊ देणार नाही असे ते म्हणाले. आतापर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी १ लाख ३३ हजार १०० कोटी रुपये मिळाले आहेत. पैसे देण्यातील अडचणींवर कायमचा तोडगा काढण्यात येणार आहे. ऑनलाइन तोडणी पावती मिळत असल्याने ऊस माफियांवर अंकुश लावला गेला असून भ्रष्टाचार रोखल्याचा दावा त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी वेबसाईट, ई गन्ना अॅप, सर्व्हे, कॅलेंडर आणि समित्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा या उपाययोजनांचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला. साखरेच्या उत्पादनाबरोबरच कारखाने इथेनॉल उत्पादनात अग्रेसर असल्याचे ते म्हणाले. सॅनिटायझर उत्पादनासह बंद कारखाने सुरू करण्यावर त्यांनी भर दिला.

या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवादावेळी बस्ती येथील शेतकरी अरविंद कुमार सिंह यांनी सहकारी कारखान्याच्या आधुनिकीकरणाची मागणी केली. कुशीनगरच्या धीरेंद्र सिंह, मेरठचे विनोद कुमार सैनी, बागपतचे कृष्णपाल सिंह, लखीमपूरचे जगतार सिंह, पिलीभीतचे गुरुमंगत सिंह आदींनी सरकारच्या उपाय योजनांचे कौतुक केले.

यावेळी ऊस मंत्री सुरेश राणा यांनी खांडसरी उद्योग अधिक मजबूत केला जाईल असे सांगत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. राज्यात या उद्योगाला दुहेरी लाभ झाला आहे. ग्रामीण भागात रोजगार वाढला आहे. एकही कारखाना बंद होऊ दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अपर मुख्य सचिव संजय भूसरेड्डी, नवनीत सहगल, एस. पी. गोयल आणि संजय प्रसाद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here