पुणे: महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात सोलापूर, कोल्हापूरनंतर आता नांदेड विभागातील साखर कारखान्यांनीही गाळप संपुष्टात आणले आहे.
नांदेड विभागातील एकूण २६ कारखान्यांनी चालू हंगामात सहभाग घेतला. हे सर्व कारखाने आता बंद झाले आहेत. विभागात ९४.२८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले असून ९३.९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १० टक्क्यांपर्यंत आहे. सद्यस्थितीत नांदेड विभागाचा साखर उतारा ९.९७ टक्के नोंदवला गेला आहे.
राज्यात १७३ कारखाने बंद झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील माहितीनुसार, ४ मे २०२१ अखेर १९० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात १००९.४ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०५९.२४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४९ टक्के आहे.
साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील ४३ कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागातील ३७ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. पुणे विभागात २८, अहमदनगर विभागात १९, औरंगाबाद विभागातील १७ कारखाने बंद झाले आहेत. अमरावतीमधील २ आणि नागपूर विभागातील ३ कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.