परकीय चलन गंगाजळीत घसरण, गोल्ड रिझर्व्हही झाले कमी

देशाच्या परकीय चलन साठ्यात घसरण झाली आहे. ८ जुलै रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात ८.०६२ अब्ज डॉलरने घटून हा चलनसाठा ५८०.२५२ अब्ज डॉलर राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आकडेवारी जारी करुन ही माहिती दिली आहे. आरबीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार एक जुलै रोजी समाप्त झालेल्या आधीच्या आठवड्यात परकीय चलन साठा ५.००८ अब्ज डॉलरने घटून ५८८.३१४ अब्ज डॉलरवर आला होता. आठ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात घट होण्याचे कारण म्हणजे परकीय चलनाच्या मालमत्तेचे नुकसान, जे एकूण गंगाजळीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात विदेशी मुद्रा अस्तिंयामध्ये ६.६५६ अब्ज डॉलरची घट होवून ते ५१८.०८९ वर आला आहे. परकीय चलनाच्या या गटात युरो, पाऊंड, येन अशा नॉन अमेरिकन चलनाचा समावेश असतो.
आजतकवर प्रकाशित वृत्तानुसार, उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येते की, गोल्ड रिझर्व्हमध्ये घट दिसून आली आहे. सोन्याचा साठा १.२३६ अब्ज डॉलरने घटून ३९.१८६ अब्ज डॉलर झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जमा असलेल्या एसडीआरमध्ये १२.२ कोटी डॉलरची घट झाली असून एसडीआर आता १८.०१२ अब्ज डॉलरवर आला आहे. आयएमएफमध्ये देशाचा चलन साठा ४.९ कोटी डॉलरने घटून ४.९६६ अब्ज डॉलरवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here