सोमेश्‍वर साखर कारखान्याने प्रतिटन 3,450 रु. दर द्यावा, शेतकरी कृती समितीची मागणी

186

बारामती : येथील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने प्रति टन 3 हजार 450 रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच सोमेश्‍वरने विनाकपात 3,450 दर दिला तर कृती समितीच्या वतीने कारखान्याच्या संचालक मंडळाचा सत्कार करण्यात येईल, असेही काकडे यांनी सांगितले.

माळेगाव साखर कारखान्याने ऊसाला उच्चांकी दर दिल्यामुळे कृती समितीच्या वतीने कारखान्याच्या संचालकांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. याबाबत सोमेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी माळेगाव कारखान्याने गेटकेनच्या मेहरबानीवर दर दिला असल्याचा आरोप केला होता. याचाही खरपूस समाचार काकडे यांनी पत्रकात घेतला आहे. सोमश्‍वरने सभासदांना जादा दर न देता 44 कोटींचा निधी तयार करुन ठेवला. अनेक विकास कामांच्या घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात कामाला सुरुवातही नाही. त्यामुळे कारखान्याची अकार्यक्षमताच दिसून आल्याचे काकडे यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षात सोमेश्‍वरने शिक्षण संस्था इमारतीच्या नावाखाली सभासदांचे सुमारे 8.50 कोटी रुपये कपात करुन घेतले. तसेच, कारखान्यात गरज नसताना अनावश्यक कामांचा घाट घातला. जादा ऊसदर मिळण्यासाठी गेल्या वर्षी 20 कोटींच्या चढउतार निधीला सभासदांनी मंजूरी दिली होती. त्यातून 150 रुपयांची तरतूद करत 3 हजार 450 रुपये दर देणे सोमेश्‍वरला सहज शक्य होते, पण ते कारखान्याने केले नाही. हा दर दिला तर आंम्ही तुमचाही जाहीर सत्कार करु, असे काकडे म्हणाले.

माळेगाव कारखान्याबाबत बोलताना काकडे म्हणाले, सोमेश्‍वरचा जन्म गेटकेनच्या ऊसावर झाला. गेटकेनला कमी पैसे दिल्यामुळे सभासदांना जादा पैसे मिळाल्याचेही काकडे यांनी सांगितले. गेल्या सात आठ वर्षांपूर्वी सोमेश्‍वरने विस्तारीकरण केल्यानंतर फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांकडून भाग अनामतच्या नावाखाली लाखो रुपये घेत त्यांना नाममात्र सभासद केले गेले. शिवाय 67 कोटींचा तोटा भरुन 266 कोटी रुपये कर्ज फेडल्याचे अध्यक्षांचे म्हणणे आहे. मुळात हा तोटा व कर्ज तुम्ही संचालक असतानाच झालेले नाही का, असा प्रश्‍नही काकडे यांनी उपस्थित केला. शिवाय सभासदांना एफआरपीपेक्षा एक रुपयाही अधिक मिळालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच संचालक मंडळाने वीजनिर्मितीसह विस्तारीकरणाचा घातलेला घाट कृती समितीच्या योग्य हस्तक्षेपामुळेच आ. अजित पवार यांनी थांबवला. सोमेश्‍वर कार्यक्षेत्रात 265 जातींच्या ऊसाची रिकव्हरी कमी असल्याचा मुद्दाही काकडे यांनी अमान्य केला. तसेच या ऊसजातीमुळेच कारखान्याचा उतारा वाढला असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.

माळेगाव गेली पाच वर्षे कामाच्या निविदा, खरेदी ऑनलाइन पद्धतीने करीत आहे. सोमेश्‍वरमध्ये जाणीवपूर्वक ही पद्धत अवलंबिली जात नाही, ती सुरु करावी अशी मागणीही काकडे यांनी केली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here