संगरुर : धुरी येथील ऊस उत्पादक संघर्ष समितीकडून साखर कारखान्यांकडून ऊसाची थकबाकी मिळविण्यासाठी निमंत्रक हरजीत सिंह बुगरा यांच्या नेतृ्त्वाखाली मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या धुरी येथील कार्यालयासमोर सलग दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू राहिले. या दरम्यान ऊस उत्पादक समितीचे दोन प्रवक्ते जतिंदर सिंह व खुशवंत सिंह हातामध्ये पेट्रोलच्या बाटल्या घेऊन मुख्यमंत्री कार्यालयावरील पाण्याच्या टाकीवर चढले. तेथे त्यांनी थकीत ऊस बिले मिळत नसल्याबाबत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या उपजिल्हाधिकारी देवदर्शन सिंह, धुरीचे पोलीस अधीक्षक परमिंदर सिंह, पोलीस निरीक्षक हरजिंदर सिंह व पोलीस निरीक्षक अवतार सिंह यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेअरमन हरजीत सिंह, शेतकरी नेते अवतार सिंह भुलरहेड़ी यांनी सांगितले की, ऊस उत्पादक धुरी साखर कारखान्याकडून आपली १७ कोटी रुपयांची थकबाकी मिळविण्यासाठी दीर्घ कालापासून संघर्ष करीत आहेत. प्रशासनाकडून वारंवार तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही साखर कारखान्याचे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता कारखान्यावर विश्वास ठेवला जाणार नाही. शेतकऱ्यांनी याप्रश्नी एक दिवसाची मुदत देत प्रश्न न सुटल्यास संघर्ष तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी शेतकरी नेते जरनैल सिंह, हरपाल सिंह, कुलदीप सिंह, जोध सिंह, संत सिंह, बलवीर सिंह आदी उपस्थित होते.