वेळेवर ऊसाचे वजन न केल्याने शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

सहारनपूर : टिकरौल गावात किसान सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यावर वेळेवर ऊस वजन केला जात नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी वजन केंद्रावरच धरणे आंदोलन केले. साखर कारखान्याच्या सीसीओंनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन समाप्त केले. टिकरौलमधील ऊस वजन केद्रावरील ऊस वजन प्रक्रियेत अडथळे आल्याने मंगळवारी शेतकऱ्यांनी धरणे धरले. दररोज उसाचे वजन न करता दोन ते तीन दिवसानंतर वजन केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे वजन केंद्रावर मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या केंद्राच्या ठेकेदाराकडे पुरेशी व्यवस्था नसल्याने वजन केंद्रावर ही परिस्थिती ओढवल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष केले गेले. शेतात ऊस शिल्लक असल्याने पुढच्या पिकावर परिणाम होत आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाने येथील अडथळे दूर करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी कारखान्याचे सीसीओ धनीराम यांनी धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. वाहनांची संख्या वाढवून ऊस वजनातील अडथळे दूर करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. चौधरी सुभाष, महेंद्र शर्मा, सतवीर सिंह, जसबीर सिंह, भोपाल सिंह, सुमित चौधरी, गौरव चौधरी, नरेंद्र कुमार, संजय कुमार, सतबीर सैनी, बबलू आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here