ऊस दर जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

डोईवाला : गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकारने ऊस दर जाहीर करावा अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. कारखान्याला आपण पाठवत असलेल्या ऊसाचा दर किती आहे, याची माहिती असणे गरजेचे आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देऊन लवकरात लवकर ऊस दर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

संयुक्त किसान मोर्चाची बैठक गुरुद्वारा लंगर हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सरकारकडून नवा ऊस दर जाहीर न केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. याशिवाय २६ नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल निदर्शने करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष दलजीत सिंह म्हणाले, गळीत हंगाम कधी सुरू होणार याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मात्र, नवा ऊस दर जाहीर केलेला नाही. सरकारने यंदा ४५० रुपये प्रती क्विंटल ऊस दर दिला पाहिजे. संयुक्त किसान मोर्चाचे अध्यक्ष ताजेंद्र सिंह यांनी सांगितले की, सरकारने ऊस उत्पादकांच्या भावना लक्षात घेऊन नवा दर निश्चित करावा. या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी कारखान्यात जावून कार्यकारी संचालकांच्या कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक आंदोलन केले. त्यानंतर त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाकियूच्या टिकैतगटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंह खालसा, जिल्हा संयुक्त सचिव याकूब अली, उम्मेद बोरा, जाहीद अंजुम, बलबीर सिंह, कमल अरोरा, सरजीत सिंह, हरभजन सिंह, गुरदीप सिंह, हरविंदर सिंह, रणदीप सिंह, गुरचरण सिंह, रणजोध सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here