कागल तालुक्यात ऊस दरासाठी शेतकरीच आक्रमक

कोल्हापूर : कागल तालुक्यातील साखर कारखाने सुरू होवून १५ दिवस उलटले तरीही गाळप संथगतीने सुरू आहे. कागल तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव कमी आहे. मात्र शेतकरी गट-तट बाजूला ठेवून रस्त्यावर उतरले आहेत. सद्यस्थितीत सध्या अपवाद वगळता शेतकरी आणि वाहनधारकांचे नुकसान होवू नये, यासाठी समन्वय साधत शांततेने आंदोलन सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावात शेतकरी संघटनेच्या शाखाही स्थापन झाल्या आहेत.

कागलमधील छत्रपती शाहू, हमिदवाडा, बिद्री या कारखान्यांनी यांनी पंधरा दिवसांपूर्वी तर अन्नपूर्णा शुगरने महिन्यापूर्वी गाळप सुरू केले. मात्र, आंदोलनामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप धिम्यागतीने सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षीच्या ऊसाला ४०० रुपये व यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रती टन ३,५०० रुपये दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पदयात्रेला कागल तालुक्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून महिनाभर येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यासह शेतकरीही ऊसतोड बंद करण्यासाठी प्रबोधन करत आहेत.

कागलमधील शेतकरी स्वयंस्फूर्तीने ऊस दराच्या आंदोलनात रस्त्यावर उतरला आहे. अनेक गावात ऊसदराचा तिढा सुटेपर्यंत तोड न घेण्याचा ठरावही करुन कारखानदारांची गोची केली जात आहे. ऊसाला दरवाढ मिळाली तर ती केवळ आंदोलन करणाऱ्यांनाच मिळणार नाही, तर ती सर्वांनाच मिळणार आहे. चार दिवस संयम ठेवा… असे प्रबोधन करत मोटरसायकल रॅली काढण्यात येत आहे. आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here