सांगलीतील ऊस दराच्या तोडग्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

सांगली : सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी सर्व कारखानदारांची बैठक बोलविली आहे. बैठकीस शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलविल्याची माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. दरम्यान, या बैठकीत तोडगा निघणार की त्यापूर्वीच कारखानदार दराची कोंडी फोडणार, याची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ज्या कारखान्याची एफआरपी ३,००० पेक्षा कमी आहे, त्यांनी प्रती टन १०० रुपये द्यावेत आणि उर्वरित कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रती टन ५० रुपये जादा द्यावेत, असा तोडगा निघाला आहे. ‘स्वाभिमानी’ने गेल्या वर्षीच्या उसाला प्रती टन ४०० रुपये आणि चालू हंगामासाठी उसाला प्रती टन ३,५०० रुपये दर मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन चालू केले होते. गुरुवारी या मागण्यांसाठी पुणे ते बेंगळुरू महामार्गावर कोल्हापुरातील शिरोली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. ५० व १०० रुपये द्यावेत असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर ‘स्वाभिमानी’ने आंदोलन मागे घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here