मराठवाडयात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

औरंगाबाद : एकीकडे, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण जनजीवन पुरामुळे विस्कळीत झाले होते. तर दुसरीकडे मराठवाड्याला दुष्काळाने वेढले आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने शेतकरी व्यथित झाला आहे, तर मराठवाडयात पिकांना पाणीच न मिळाल्याने पिके करपून गेली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मराठवाडा पुन्हा एकदा दुष्काळाच्या सावटाखाली जाण्याचे चित्र दिसत आहे.

पावसाळ्याचे दोन महिने आता उलटूनही गेले आहेत, पण मराठवाडयात पाऊस झालेला नाही. आतापर्यंत केवळ ३१६ मिलीमिटर पाऊस झाला आहे, अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ६०.०३ टक्के असलेला पाऊस वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ४०.७ टक्के आहे. ऑगस्ट महिन्यात ही अवस्था आहे. जुलै महिन्यात औरंगाबाद, जालना, नांदेड तसेच हिंगोलीच्या काही भागामध्ये झालेल्या पावसामुळे चित्र बदलले होते. पण, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यावर असलेला पावसाचा रुसवा अद्याप कायम आहे. मराठवाड्यात पावसाची सरासरी ७९९ मिलीमिटर आहे, पण अजूनही पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पूर किंवा दुष्काळ दोन्हीही संकटाचा पहिला परिणाम हा शेतीवर अधिक प्रमाणात होत असतो. ज्याची झळ शेतकऱ्याला बसते. शेतीला आवश्यक असणाऱ्या पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्प उर्ध्व भागातील पावसामुळे तुडूंब भरला असला तरी विभागातील लघू व मध्यम प्रकल्प मात्र कोरडे आहेत. जायकवाडी धरणामध्येही मुबलक पाणी आहे, धरणावर अवलंबून असलेली गावे, शहरांची अडचण नाही, मात्र उस्मानाबाद व लातूर शहरांना येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. औरंगाबाद आणि जालना, तसेच नांदेडमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सातत्याने पाऊस झाला. त्यामुळे या भागातील पिकांना जीवदान मिळाले, मात्र बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यंदा पाण्याच्या सर्वाधिक दुष्काळाला सामोरे गेलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ७५ टक्के, तर जालना जिल्ह्यात ६१.९८ टक्का पाऊस पडला आहे. नांदेड जिल्ह्यातही ७५.५७ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत बीड जिल्ह्यात अद्याप निम्माही पाऊस झालेला नाही, जिल्ह्यात केवळ ४४.५४ असा सर्वात कमी पाऊस झालेला असून, उस्मानाबाद जिल्ह्यातही केवळ ५६.३६ टक्के पाऊस झाल्याने चिंता वाढल्या आहेत.

बीड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला असून येथे पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक ७७६ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गेवराई, शिरुर कासार, वडवणी, माजलगाव, केज, धारुर, परळी या तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झालेला नाही. लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, चाकूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, भूम, परंडा, हिंगोली जिल्ह्यातील वसमत व सेनगाव तसेच परभणी जिल्ह्यातील सेलू या तालुक्यांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत निम्माही पाऊस झालेला नाही.

मराठवाड्यातील आतापर्यंतचा पाऊस

जिल्हा               पडलेला पाऊस             वार्षिक टक्केवारी

औरंगाबाद               ७५.०                       ४८.७९

जालना                   ६१.९८                      ४०.५८

परभणी                  ५६.४५                     ३७.०३

हिंगोली                   ६०.४८                     ४३.२१

नांदेड                     ७५.५७                    ५१.०८

बीड                       ४४.५४                    २७.१

लातूर                      ६०.६०                    ३७.५७

उस्मानाबाद                ५६.३६                   ३५.६३

————————————————————–

एकूण                     ६३.०३ टक्के             ४०.५७ टक्के

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here