ऊस तोड मजुरांकडून पैशांसाठी अडवणूक; ऊस उत्पादक हतबल

सातारा : ऊस तोड मजुरांकडून मनमानीपणे होणारी पैशांची मागणी आणि गाव पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. आपल्या ऊसाची लवकरात लवकर तोडणी होऊन तो कारखान्यात जावा यासाठी शेतकऱ्यांना गाव पुढाऱ्यांच्या घरांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे. एका गावात ऊसतोडणी मजुरांच्या केवळ दोन-तीन टोळ्या असून ऊस तोडीचे नियोजन जणू काही आपल्या मार्गदर्शनाखाली सुरू अशा आविर्भावात गाव पुढारी आहेत.

दरवर्षी ऊस गळीत हंगाम साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस कोसळत होता. त्यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यात अडचण निर्माण झाली होती. गळीत हंगाम सुरू होण्यासाठी डिसेंबर महिना उजडला. त्यातच कारखान्यांकडे पुरेशा संख्येने ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्याही नाहीत. एका गावासाठी ऊसतोड मजुरांच्या केवळ दोन-तीन टोळ्यांचे नियोजन कारखान्यांकडून करण्यात आले आहे. ऊस तोडण्यासाठी कारखान्यांकडे आधुनिक यंत्रणा असली तरी त्यामुळे शेतजमिनीचे नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे भले उशिरा ऊस तोडा, पण मजुरांकडूनच तोडणी करा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

ऊस लागवडीवेळीच कारखान्यांकडे त्याची नोंद केली जाते. नोंद केल्याप्रमाणेच ऊसतोडणी केले जाते. अनेक ठिकाणी कार्यक्षेत्राबाहेरील कारखान्यांच्या टोळ्यादेखील आहेत. त्यांचे नियोजन गाव पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. हे गावपुढारी हे आधी स्वत:चा, नंतर आपल्या नातेवाइकांचा, नंतर वाडा, भावकी आणि त्यानंतर जवळच्या कार्यकर्त्यांच्या शिवारांमधील ऊस तोडणीचे नियोजन करत आहेत. ज्याचे कोणाशी लागेबांधे नाहीत, अशा सर्वसामान्य शेतकऱ्याचा नंबर शेवटी लागतो. त्यामुळे गरजू शेतकरी पेचात सापडत आहे. त्यात काही मजूर टोळ्या ट्रकमधून तर काही ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊसाची वाहतूक करत आहेत; परंतु रस्त्याअभावी काही शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत ट्रक जात नाहीत. त्यामुळे नंबर येऊनही त्यांच्या शेतातील ऊस तोडला जात नाही.

काही गावांमधील ऊसतोडणी अंतिम टप्प्यात आहे तर काही गावांमध्ये आता कुठे ऊसतोडणीची सुरुवात झाली आहे. प्रारंभी जोमाने ऊसतोड होते. मात्र, हा जोर हळूहळू कमी होतो. त्यानंतर ऊसतोडणीसाठी मजूर टोळ्यांकडून शेतकऱ्यांची पैशांसाठी अडवणूक केली जाते. जास्त पैसे
दिले तर त्या शेतकऱ्याच्या ऊसाची तोड आधी होते. सधन शेतकरी ऊसतोडीसाठी वाट्टेल तेवढे पैसे मोजत आहेत. मात्र, सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. आधीच खत-मातीसाठी सोसायटी, पतसंस्था, बँकांचे कर्ज घेणारा शेतकरी ऊसतोडणी मजुरांच्या टोळीला कुठून पैसे द्यायचे, या विवंचनेत सापडला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here