शेतकऱ्यांनो, ऊस लागवडीपूर्वी बियाणे प्रक्रियेवर भर द्या : वैभव शिंदे

पुणे : ऊस शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे प्रक्रिया करणे गरजेचे आहे. बियाणे प्रक्रियेनंतर माती परीक्षण करून खतांची मात्रा द्यावी. उस उत्पादन वाढीकरिता शेतकऱ्यांनी एकात्मिक खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असा सल्ला नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक वैभव शिंदे यांनी दिला.

कळंब येथे सकाळ-ॲग्रोवन आणि रिवुलिस इरिगेशन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ऊस पीक व पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयावरील ॲग्रो संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शिंदे यांनी ठिबक सिंचन, जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन परिसंवादात करण्यात आले. रिवुलिस इरिगेशन कंपनीचे व्यवस्थापक योगेश कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी. आर. भालेराव, वितरक अनिल चिखले आदींसह शेतकरी उपस्थित होते.

भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक बाबूराव कानडे, शरद सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत थोरात, प्रगत शेतकरी सागर चिखले, शंकर भालेराव आदींनी चर्चेत भाग घेतला. हिरवळीची खते, जैविक खते व पाण्याचा योग्य वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. रिवुलिस कंपनीचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ नितीन जाधव, भीमाशंकर कारखान्याचे विकास अधिकारी विकास टेंगले, कृषी साहाय्यक दीपाली धिमते यांनी मार्गदर्शन केले. नांदूरचे उपसरपंच शेखर चिखले यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here