शेतकऱ्यांनी जादा उत्पादनासाठी खोडव्याचे काटेकोर व्यवस्थापन करण्याची गरज : तज्ज्ञांचा सल्ला

पुणे : अनेक शेतकरी खोडवा ऊस ठेवतात. मात्र त्याचे उत्पादन फारच कमी मिळत असल्याची तक्रार असते. मात्र, अनेकदा लागवडीच्या उसाप्रमाणे खोडव्याचे व्यवस्थापन केले जात नाही. खरेतर खोडवा उसासाठी पूर्व मशागतीची आवश्यकता नसते. बेणे खर्चाची बचत होते. पहिल्या पिकाची मुळे तयार असल्यामुळे वाढ झपाट्याने होते. पक्वता लवकर मिळते, असे फायदे आहेत. शेतकऱ्यांनी खोडवा उसाचे काटेकोर व्यवस्थापन करावे असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

‘अॅग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नाशिकच्या क. दु. सि. पा. कृषी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. विशाल गमे यांनी सांगितले की, लवकर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक फायदा मिळतो. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या ऊस वाणांचा खोडवा ठेवावा. कोसी-६७१, को-९४०१२, को-८०१४, व्ही.एस.आय.-४३४, कोएम -८८१२१, को-८६०३२, फुले-२६५, व्ही.एस.आय. -९८०५ या जातींचा खोडवा चांगला येतो. खोडव्यातील मशागत व पाचट व्यवस्थापन निट करावे. एकरी ३०-३२ किलो युरिया व ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. खोडवा उसाची अन्नद्रव्याची गरज सुरू उसासारखीच असते. ही मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्यावी. ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत एकरी ५० किलो नत्र, स्फुरद २३ ते २५ किलो, पालाश २३ ते २५ किलो या प्रमाणे द्यावा. त्यानंतर साधारण १३० दिवसांनी तेवढीच खत मात्रा द्यावी. ही खते पहारीच्या साह्याने मुळांच्या सान्निध्यात द्यावीत. पाण्याची उपलब्धता असल्यास गरजेनुसार दर १५ दिवसांनी पाणी द्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here